पन्हाळ्यावर चालूवर्षी शिवजयंती ३९१ वृक्षारोपणाने साजरी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:25 AM2021-02-11T04:25:34+5:302021-02-11T04:25:34+5:30
पन्हाळा : पन्हाळगडावर यंदा ३९१ पारंपरिक झाडे लावून शिवजयंती साजरी होणार आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते झाडांचे ...
पन्हाळा : पन्हाळगडावर यंदा ३९१ पारंपरिक झाडे लावून शिवजयंती साजरी होणार आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते झाडांचे वाटप केले जाणार आहे. हा उपक्रम उद्या, शुक्रवारी (दि. १२) होणार असल्याची माहिती पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्या दुपारी एक वाजता वीर बाजीप्रभू देशपांडे पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिरपर्यंत वृक्षदिंडी होणार आहे. त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन व मंदिर परिसरात वृक्षरोप वाटप उपक्रमाचे उद्घाटन अभिनेते सयाजी शिंदे, आमदार डाॅ. विनय कोरे, माजी खा. राजू शेट्टी, न्यायाधीश बी. डी. कदम, केमिस्ट असोसिएशनचे राज्य संघटन सचिव मदन पाटील, मदत फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. विजय गावडे यांच्या हस्ते होणार आहे. पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद, शिवराष्ट्र हायकर्स, सह्याद्री देवराई, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडिया (कोल्हापूर विभाग), कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन, मदत फाउंडेशनच्या वतीने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. नगराध्यक्षा धडेल यांनी सांगितले की, ३९१ वृक्षारोपण उपक्रमांतर्गत पन्हाळगडावरील पुसाटी बुरूज मार्ग, पन्हाळा क्बल यांच्या बीएसएनएल टॉवर परिसर, काली बुरूज, धान्य कोठार, आदी परिसरात विविध प्रकारची औषधी, फळ आणि फूलझाडे लावली जाणार आहेत. प्रशांत साळुंखे म्हणाले, शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून कृतिशील शिवजयंतीची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. माहुली किल्ला, ताराराणी समाधीस आर्थिक मदतीचा हात तसेच अपरिचित शिवछत्रपती विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियाचे कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष अमित पाटील, रोहित ढिसाळ, आदी उपस्थित होते.