एक वर्षात आहे तेथेच ! कोल्हापूर थेट पाईपलाईनचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:01 AM2018-06-13T00:01:06+5:302018-06-13T00:01:06+5:30
गेली चार वर्षे सुरू असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम अद्यापही संथगतीनेच सुरू असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त अभिजित चौधरी यांनी मंगळवारी योजनेचे काम घेतलेल्या ठेकेदार तसेच
कोल्हापूर : गेली चार वर्षे सुरू असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम अद्यापही संथगतीनेच सुरू असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त अभिजित चौधरी यांनी मंगळवारी योजनेचे काम घेतलेल्या ठेकेदार तसेच सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ‘सगळे काम आहे त्याच ठिकाणी आहे. एक वर्षात तुम्ही काय काम केले ते दाखवा,’ अशा शब्दांत आयुक्तांनी त्यांना खडसावले. कितीही अडचणी असल्या तरी कामाची गती वाढवून तसेच जादा यंत्रणा लावून काम पूर्ण करा, असे आदेश महापौर शोभा बोंद्रे यांनी दिले.
कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या थेट पाईपलाईन योजनेचे काम किती पूर्ण झाले आहे, त्यामध्ये काय अडचणी आहेत याचा आढावा घेण्यासाठी महापौर बोंद्रे व आयुक्त चौधरी यांनी मंगळवारी पाहणी दौरा केला.
काळम्मावाडी धरण क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कामाची गती अगदीच संथ असल्याने आणि कामात योग्य समन्वय नसल्याचे दिसताच आयुक्तांनी अधिकाऱ्यांना खडसावण्यास सुरुवात केली. ‘एक वर्षात काय काम केले सांगा,’ असे आयुक्तांनी विचारताच प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी यांनी कामात आलेल्या अडचणी सांगण्यास सुरुवात केली. इंटकवेलच्या कामास सुरुवात नाही. कॉपर डॅमची उंची वाढविण्याचे काम रखडले आहे.
ही कामे रखडण्याचे कारण काय, तुम्ही पावसाळा सुरू होण्याची वाट बघत बसला आहात काय? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. ‘इंटकवेल’चे स्ट्रक्चरल डिझाईन लवकर मिळाले नाही, असे माळी यांनी खुलासा केला. त्यावेळी आयुक्तांनी सल्लागार कंपनीचे अधिकारी राजेंद्र हासबे यांना जाब विचारला. ‘डिझाईन का वेळेत दिले नाही, काय करता तुम्ही?’अशा शब्दांत हासबे यांना झाडले. आयुक्तांच्या आक्रमक भूमिकेमुळे माळी व हासबे यांची भंबेरी उडाली.
धरण क्षेत्रातील कामे, जलवाहिनी टाकण्याचे काम, पुईखडी येथील जलशुद्धिकरण केंद्राचे काम अपूर्ण आणि संथगतीने सुरू असल्याबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणत्याही प्रकारचे अडथळे आता नसताना कामात दिरंगाई होत असेल तर आपणास करारातील तरतुदीप्रमाणे कारवाई करावी लागेल, असा दमदेखील भरला.
महापौर बोंद्रे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे. आवश्यक ती जादा यंत्रणा लावा. कामाची गती वाढवा आणि ते लवकरात लवकर पूर्ण करा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.यावेळी उपमहापौर महेश सावंत, सभागृह नेता दिलीप पोवार, शिक्षण सभापती वंदना देठे, नगरसेविका दीपा मगदूम, शोभा कवाळे, सूरमंजिरी लाटकर, नगरसेवक संदीप नेजदार, संजय मोहिते, राहुल माने, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे उपस्थित होते.
सोळांकूर ग्रामस्थांशी पुन्हा चर्चा
सोळांकूर येथून जलवाहिनी टाकण्याचा गुंता अद्याप मिटलेला नाही. ग्रामस्थांचा विरोध कायम आहे. यापूर्वी त्यांच्याशी चर्चा केली आहे. पुन्हा एकदा चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. अगदीच टोकाचा विरोध झाला तर मात्र पोलीस संरक्षणात काम करावे लागेल, असा इशारा आयुक्तांनी दिला. काम करण्यास सर्व विभागाकडून परवानगी मिळाल्या आहेत, तरीही कामात विलंब होत आहे हे वास्तव आहे हे आयुक्तांनी मान्य केले.
डिसेंबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करणार : ठेकेदार कंपनीचे अधिकारी राजेंद्र माळी यांनी थेट पाईपलाईपचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही महापालिकेला दिली. यापूर्वी हे काम ३१ मे २०१७ रोजी पूर्ण करायचे होते. मात्र, ते शक्य झालेले नाही. कामात अनेक अडचणी असल्यामुळे ते रखडले आहे; परंतु पुढील दीड वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन केले जाईल, असे माळी यांनी स्पष्ट केले.
दोन महिन्यांत केवळ २२ मीटरपर्यंत जॅकवेल खुदाई.
आता पावसाळा सुरू झाल्यावर काम होणार बंद.
जानेवारीपर्यंत धरण क्षेत्रात काम करणे अशक्य.
३७ किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण.
अद्याप १६ कि.मी. जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्णच.
एमएसर्ईबी पोल शिफ्टिंगमधील दिरंगाईमुळे काम रखडले.
धरण क्षेत्रात कॉपर डॅमची उंची वाढविण्याचे काम अपूर्ण.
पुईखडी जलशुद्धिकरण केंद्राचे काम पन्नास टक्केच पूर्ण.
सोळांकूर येथील जलवाहिनी टाकण्याच्या गुंता अद्याप कायम.
वेळेत काम पूर्ण केले नाही म्हणून ठेकेदारास रोज पाच हजारांचा दंड.
कामाची गती वाढविण्याच्या ठेकेदारास सक्त सूचना
थेट पाईपलाईन योजनेत कोणत्याही प्रकारचे अडथळे आता नसताना कामात दिरंगाई होत असेल तर ठेकेदार कंपनीवर करारातील तरतुदीप्रमाणे कारवाई करावी लागेल.
- अभिजित चौधरी, आयुक्त