यंदा डोळ्यात ‘पाणी’,,जिल्ह्यातील ९३ गावे टंचाईग्रस्त

By admin | Published: April 2, 2016 12:44 AM2016-04-02T00:44:46+5:302016-04-02T00:49:15+5:30

टंचाईच्या झळा : गरज ११.५ टीएमसीची, उपलब्ध १२ टीएमसी पाणीसाठा

This year, 'water' in the eye, 93 villages in the district scarcity-related | यंदा डोळ्यात ‘पाणी’,,जिल्ह्यातील ९३ गावे टंचाईग्रस्त

यंदा डोळ्यात ‘पाणी’,,जिल्ह्यातील ९३ गावे टंचाईग्रस्त

Next

राजाराम लोंढे -- कोल्हापूर -धरणांतील उपलब्ध पाणीसाठा व जिल्ह्याची आगामी तीन महिन्यांची गरज पाहिली तर काटकसरीने पाण्याचा वापर केला तरच जूनपर्यंत पाणी पुरणार आहे. तीन महिन्यांत शेती, उद्योग व पिण्यासाठी किमान ११.५ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे, पण धरणांत ‘वारणा’वगळता १२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. चिकोत्रा खोऱ्यात गेल्या दोन महिन्यांपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत, पण आता पंचगंगा, भोगावती, दूधगंगा व वेदगंगा खोऱ्यांवरही टंचाईची गडद छाया दिसत आहे.जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा हे चार मोठे, आठ मध्यम, तर ५३ लघु पाटबंधारे आहेत. या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ८६ टीएमसी आहे. त्यातून दरवर्षी पिण्यासाठी ८, उद्योगासाठी २ तर शेतीसाठी ५५ टीएमसी पाणी लागते. जिल्ह्यातील प्रमुख १३ धरण क्षेत्रांत सरासरी ३७७८ मिलीमीटर पावसाची नोंद होते; पण यंदा केवळ २३३९ मिलीमीटर पाऊस झाला. १४३९ मिलीमीटर पाऊस कमी झाल्याने धरणात ७३ टीएमसी पाणी साठले. त्यात पाऊस कमी असल्याने पाणीपातळी खालावल्याने जमिनीची भूक वाढली आहे. परिणामी, आगामी तीन महिन्यांत नेहमीपेक्षा २५ टक्के जादा पाणी शेतीसाठी लागणार आहे. त्याचबरोबर उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवनही अधिक होणार असल्याने त्याचा फटकाही बसणार आहे. एप्रिल ते जूनपर्यंत पिण्यासाठी २.५, उद्योगासाठी १, तर शेतीसाठी ८ असे ११.५ टीएमसी पाणी लागेल. त्यामुळे काटकसरीने वापर केला तरच जूनपर्यंत पाणी पुरणार आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने उपसा बंदी सुरू केली असून पिण्यासाठी जलसाठा राखीव ठेवण्याची तयारीही केली आहे.


शिल्लक पाणीसाठा
कंसात क्षमता टीएमसीमध्ये
राधानगरी - २.४७ (८.३६१)
तुळशी - १.५२ (६.३७)
वारणा - १०.०९ (३४.३९९)
दूधगंगा - ४.९० (२५.३९३)
कासारी - १.१२(२.७७४)
कडवी - १.६४ (२.५१६)
कुंभी - १.६३ (२.७१५)
पाटगांव - १.६५ (३.७१६)
चिकोत्रा - ०.३३ (१.५२२)
चित्री - ०.६५ (१.८८६)
जंगमहट्टी - ०.३६ (१.२२४)
घटप्रभा - १.०३ (१.५४०)


असा आहे पाण्याचा ताळेबंद
टीएमसीमध्ये -
धरणांची क्षमता८६
पिण्यासाठी ८
उद्योगासाठी २
शेतीसाठी ५५
दरवर्षी शिल्लक किमान २० टीएमसी
यावर्षीचा साठा :
शिल्लक साठा १७ टीएमसीपैकी
उपयुक्त १२ टीएमसी
एप्रिल ते जूनपर्यंत आवश्यक पाणी-
पिण्यासाठी २.५
उद्योगासाठी १
शेतीसाठी ८


पाटबंधारे विभागाची उपाययोजना-
आॅक्टोबरमध्येच चिकोत्रा धरणातील पाणी आरक्षित
जानेवारीपासून दूधगंगा, राधानगरी लाभक्षेत्रात उपसाबंदी.
फेबु्रवारीत पाच दिवस उपसा बंदी १२ दिवस सुरू.
एप्रिलपासून १० दिवस बंदी व १० दिवस सुरू.


शेतीसाठी जास्त पाणी लागण्याचे कारणे :
पाऊस कमी झाल्याने जमिनीची पाणीपातळी खालावली.
बारमाही पिकांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक.
परवानगीपेक्षा जास्त क्षेत्राला पाणी.


जिल्ह्यातील ९३ गावे टंचाईग्रस्त
कोल्हापूर : कोल्हापूरकरांना येणाऱ्या काळात पाणी संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ९३ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली.
सैनी म्हणाले, पाण्याच्या उपलब्ध साठ्याचे नियोजन केले जात आहे. टंचाईग्रस्त गावात आवश्यक त्या उपाययोजना पुरविल्या जाणार आहेत तसेच या ठिकाणी आणखी जादा कामाची गरज असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने पाठविल्यास या ठिकाणी उपाययोजना केल्या जातील. यामध्ये विहीर अधिग्रहण, कू पनलिका, तात्पुरती नळ पाणी सुविधा, आदींचा समावेश आहे.
ते पुढे म्हणाले, नळांच्या गळती होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. पाण्याचा बेकायदेशीरपणे उपसा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत.



शहरात चाळीस टक्के कपात
पालिकेचे नियोजन : दिवस आड पाणीपुरवठा
कोल्हापूर : राधानगरी व काळम्मावाडी धरणांतील पाणीसाठा संपत आल्यामुळे कोल्हापूर शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनाची शुक्रवारपासून अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे निम्म्या शहराला शुक्रवारी पाणीपुरवठा झाला नाही. पहिल्याच दिवशी ४0 टक्के पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली. येत्या आठ दिवसांत काय अनुभव येतात हे पाहून पाणी वाटपाचे फेरनियोजन केले जाईल, असे मनपा जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या उपलब्ध असणारे पाणी जून महिन्यापर्यंत पुरवून वापरायचे आहे. त्यामुळे नदीकाठावर पाणी उपसाबंदी लागू करण्याबरोबरच कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करणे आवश्यक ठरले आहे. जलसंपदा विभाग आणि कोल्हापूर महानगरपालिका यांनी बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेतले आहेत. त्यानुसार शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात शुक्रवारपासून त्याची सुरुवात झाली.
शहरवासीयांनाही पाण्याचे महत्त्व कळल्यामुळे या नियोजनाचा स्वीकार केला आहे. शहर पाणीपुरवठा विभागाने शहराचे दोन भाग केले आहेत. सम आणि विषम तारखांना हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. शुक्रवारी ज्या भागात पाणीपुरवठा करण्यात आला, त्यांचा पाणीपुरवठा शनिवारी खंडित करण्यात येईल आणि ज्या भागांना शुक्रवारी पाणी दिले नाही, त्यांना शनिवारी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने एक दिवस आड पूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
शुक्रवारी ज्या भागात पाणीपुरवठा झाला, तेथे नेहमीपेक्षा तास दोन तास अधिक वेळ, शिवाय जादा दाबाने पाणी देण्यात आले. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. पाणी वाटपाचे नियोजनात काय अडचणी आहेत, हे पाहून येत्या आठ दिवसांत अ
ंतिम नियोजन करण्यात येईल, असे जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले. शहरास दररोज १२० एमएलडी पाणीपुरवठा केला
जातो. त्यातील अंदाजे ३० एमएलडी पाणी गळतीद्वारे वाहून जाते. प्रत्यक्षात ८० एमएलडी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पहिल्या दिवशी ४0 एमएलडी पाणी कपात होईल, असे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


दहा टँकर भाड्याने घेण्याचा विचार
महानगरपालिकेकडे केवळ सहा पाण्याचे टँकर उपलब्ध आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या भागात हे टॅँकर फिरत असतात. त्यामुळे पाणीटंचाईबाबतच्या तक्रारी पाहून जादा किमान दहा टँकर भाड्याने घेण्याचा विचार करावा लागेल, असेही पवार यांनी सांगितले. मात्र, त्यास स्थायी समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे.

Web Title: This year, 'water' in the eye, 93 villages in the district scarcity-related

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.