यंदाचा फुटबॉल हंगाम डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात--खेळाडूंसह रसिकांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 11:46 AM2019-11-25T11:46:35+5:302019-11-25T11:48:15+5:30
मागील वर्षी के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा २४ नोव्हेंबर २०१८ ला सुरू होऊन ५ जानेवारी २०१९ ला संपली, तर यंदा २४ नोव्हेंबर उलटून गेली तरी अद्यापही स्पर्धेचे काहीच सुतोवाच के. एस. ए.कडून झालेले नाही; त्यामुळे खेळाडूंसह रसिकांनाही फुटबॉल हंगाम कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
कोल्हापूर : यंदा कोल्हापूरचाफुटबॉल हंगाम नियमितपणे नोव्हेंबरच्या तिसºया आठवड्यात सुरू होतो; पण तो अद्यापही सुरू झालेला नाही; त्यामुळे फुटबॉल खेळाडूंसह रसिकांनाही प्रतीक्षा लागून राहिली आहे. फुटबॉल जाणकारांच्या मते हा हंगाम ‘केएसए’ वरिष्ठ लीग स्पर्धेच्या माध्यमातून डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोल्हापूर आणि फुटबॉल यांचं नातं घट्ट आहे; त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर फुटबॉल रसिकांचे पाय आपोआप शाहू स्टेडियमकडे वळतात; मात्र यंदा प्रथम पूर परिस्थिती, त्यानंतर अवकाळी परतीचा पाऊस, आदींमुळे फुटबॉल हंगाम लांबला आहे. त्यात मागील हंगामात एका स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे पोलीस प्रशासनाने पुढील स्पर्धा कार्यक्रमालाच बंदी घातली. त्यानंतर पुढील स्पर्धाच झाल्या नाहीत; त्यामुळे यंदाच्या हंगामाला प्रथम पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने घालून दिलेली आचारसंहिता फुटबॉलमध्ये सहभागी होणाºया १६ संघांना पाळावी लागणार आहे.
मागील वर्षी के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा २४ नोव्हेंबर २०१८ ला सुरू होऊन ५ जानेवारी २०१९ ला संपली, तर यंदा २४ नोव्हेंबर उलटून गेली तरी अद्यापही स्पर्धेचे काहीच सुतोवाच के. एस. ए.कडून झालेले नाही; त्यामुळे खेळाडूंसह रसिकांनाही फुटबॉल हंगाम कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जाणकाराच्या मते यंदाचा फुटबॉल हंगाम के. एस. ए. वरिष्ठ लीगच्या माध्यमातून डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविली आहे.
स्पर्धेचा गेल्या पाच वर्षांतील कालावधी असा, २३ नोव्हेंबर २०१४ ते २२ डिसेंबर २०१४ (२९ दिवस), ३ जानेवारी २०१६ ते ९ फेबु्रवारी २०१६ (३३ दिवस), २८ नोव्हेंबर २०१६ ते २० जानेवारी २०१७ (५३ दिवस), १९ डिसेंबर २०१७ ते ४ फेबु्रवारी २०१८ (४७ दिवस), तर मागील वर्षी २४ नोव्हेंबर २०१८ ते ५ जानेवारी २०१९ (४२ दिवस).
मागील वर्षी प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने १६ गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला होता, तर गतविजेत्या पाटाकडील तालीम संघास १४ गुणांसह दुसºया, तर बालगोपाल तालीम मंडळास १३ गुणांसह तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यंदा सर्वच १६ संघांनी चांगली कामगिरी करण्यासाठी कंबर कसली आहे. संघाचा सराव गांधी मैदान, तपोवन मैदान, पोलीस मैदान, शिवाजी स्टेडियम, आदी ठिकाणी सुरू आहे.