अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष; यावर्षीही परिस्थिती तशीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:14+5:302021-06-11T04:17:14+5:30
आरटीईअंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये इयत्ता पहिलीमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. गेल्यावर्षी कोल्हापूर ...
आरटीईअंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये इयत्ता पहिलीमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील ३४५ शाळांमध्ये १८६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद करण्यात आल्या. प्रत्यक्षात वर्ग भरण्याऐवजी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेटची सुविधा होती. त्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहिले. पण, अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठीची साधने उपलब्ध नव्हती. त्यांचे गेले शैक्षणिक वर्ष अभ्यासाविना गेले. जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. जुलैमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शाळा प्रत्यक्षात भरणार नाहीत. ऑनलाईन शिक्षणच सुरू राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठीची साधने नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे यंदाचे वर्षही अभ्यासविना जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासन, सामाजिक संस्थांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारा स्मार्टफोन, डाटा उपलब्धतेसाठी मदतीचा हात देण्याची गरज आहे.
पॉंईटर्स
आरटीईअंतर्गत जिल्ह्यात किती शाळांची नोंदणी : ३४५
किती अर्ज आले : २५००
किती जणांना प्रवेश : १८६०
गेले वर्ष वाया गेले!
कोरोनामुळे वर्ग प्रत्यक्षात भरले नसल्याने ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. त्याद्वारे शिक्षणासाठी थोडाफार दिलासा मिळाला. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची परिमाणकारकता वाढवावी.
-गौतम कांबळे, कळंबा
यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने आरटीईतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे. त्यामध्ये सुधारणा व्हावी. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजेल अशा भाषेत शिक्षण द्यावे.
- हितेश नलावडे, कागल.
कोरोनामुळे गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. यावर्षीही याच पद्धतीने शिक्षण मिळणार आहे. त्यादृष्टीने पालकांनी तयारी करावी.
-अभिजित कुंभार, उजळाईवाडी.
गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी साधनेही द्यायला हवीत
गरीब कुटुंबांतील मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठीची साधने उपलब्ध होत नाहीत. अशा विद्यार्थ्यांची गेल्यावर्षी अडचण झाली. ही अडचण दूर करण्यासाठी अशा मुलांना स्मार्टफोन, डाटा, आदी साधने द्यायला हवीत. त्यादृष्टीने शासन, शाळा व्यवस्थापन समिती आणि सामाजिक संस्थांनी समन्वयातून नियोजन करावे. शाळा व्यवस्थापन समितीने अशा गरजू गरीब विद्यार्थ्यांची नावे निश्चित करून त्यांना मदतीचा हात देण्याचे काम करावे, अशी मागणी उमेद फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी केली.
प्रतिक्रिया
आरटीईची यावर्षीची प्रवेश प्रक्रिया उद्या शुक्रवारपासून सुरू होणार आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्यात यावे, अशी सूचना शाळांना करण्यात येणार आहे.
-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी.
===Photopath===
100621\10kol_3_10062021_5.jpg
===Caption===
डमी (१००६२०२१-कोल-स्टार ७९८)