Dasara-यंदाचा शाही समोल्लंघन सोहळा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:59 PM2020-10-19T17:59:18+5:302020-10-19T18:02:04+5:30
corona virus, kolhapur, Shahu Maharaj Chhatrapati करवीर संस्थानची दिर्घ परंपरा असलेला शाही सिमोल्लंघन सोहळा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. राजघराण्यातील शाही परंपरेनुसार विजया दशमी दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी प्रत्येक वर्षी न चुकता या सोहळ्याचे आयोजन केले जाते. तथापि या दिर्घ परंपरा व रितीरिवाजात यंदा प्रथमच खंड पडणार आहे.
कोल्हापूर : करवीर संस्थानची दिर्घ परंपरा असलेला शाही सिमोल्लंघन सोहळा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. राजघराण्यातील शाही परंपरेनुसार विजया दशमी दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी प्रत्येक वर्षी न चुकता या सोहळ्याचे आयोजन केले जाते. तथापि या दिर्घ परंपरा व रितीरिवाजात यंदा प्रथमच खंड पडणार आहे.
संपूर्ण देशात म्हैसूर व कोल्हापूर या दोन राजघराण्यातर्फे दसऱ्या निमित्त शाही सिमोल्लंघन केले जाते. कोल्हापुरात दसरा महोत्सव समिती परंपरेनुसार या सोहळ्याचे आयोजन करत असते. सोनं तथा प्रतिकात्मक आपट्याची पाने लुटण्याकरिता राजपरिवारातील सर्व सदस्य शाही गणवेश परिधान करुन मेबॅक गाडीतून लवाजम्यासह ऐतिहासिक दसरा चौकात येतात.
अंबाबाई, तुळजाभवानी तसेच गुरुमहाराज यांच्या पालख्या देखिल लवाजम्यासह येत असतात. तसेच हा सोहळा पाहण्यासाठी मान्यवर हस्तींसह लाखो करवीरवासिय जमलेले असतात. अनेक वर्षाची ही प्रथा असून ती डोळ्यात साठविण्यासाठी करवीरची जनता आसुसलेली असते.
परंतू यंदा कोरोना संसर्गाचे सावट या सोहळ्यावर आहे. त्यामुळे सोहळा होणार की नाही याबाबत चर्चा सुरु होती. सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी न्यू पॅलेसवर जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याशी याविषयी चर्चा केली. यावेळी कोरोनाचा संसर्ग तसेच सोहळ्यास होणारी मोठी गर्दी यावर चर्चा झाली. सोहळ्यातील गर्दी संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरु नये, यावर दोघांचे एकमत झाले. त्यानंतर शाहू छत्रपतींनी यंदा हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आहे. आपले सणवार, उत्सव, रितीरिवाज, परंपरा अशा संकटाच्या वेळी नाही पाळल्या म्हणून काही बिघडणार नाही. आपल्या उत्सवांपेक्षा नागरीकांचे आरोग्य आमच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. एक वर्ष दसऱ्यातील समोल्लंघन केले नाही तर चालेल, पण कोरोनाला हद्दपार करण्यास आपण सज्ज होऊ या.
- श्रीमंत शाहू छत्रपती,
न्यू पॅलेस , कोल्हापूर