होय, शिवसेनेसोबत युतीसाठी भाजपा अगतिक : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 06:28 PM2018-05-26T18:28:44+5:302018-05-26T18:42:26+5:30
होय, शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजपा अगतिक आहे. कारण युती नाही झाली तर राज्यात पुन्हा काँग्रेसचा विजय होईल अशी भीती महसूलमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
कोल्हापूर : होय, शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजपा अगतिक आहे. कारण युती नाही झाली तर राज्यात पुन्हा काँग्रेसचा विजय होईल, अशी भीती महसूलमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आमची अगतिकता महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. सर्वसामान्य माणसाच्या सुखासाठी ही युती होणे आवश्यक आहे. काँग्रेसचे सरकार आले तर महाराष्ट्रात पुन्हा काय होईल, याचा अनुभव जनतेने घेतला आहेच, परंतु तरीही शिवसेनेला युती करायची नसेल तर ‘इटस ओके..!’ जे व्हायचे ते होईल त्याला आम्ही घाबरत नाही, असाही इशारा पाटील यांनी दिला.
केंद्रातील भाजपा सरकारच्या चार वर्षातील कामगिरीची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद झाली. पालघरमध्ये सत्तेतील या दोन पक्षांत इतका टोकाचा संघर्ष सुरु असल्याने राज्यात पुन्हा युती होण्याची शक्यता आहे का असे विचारता मंत्री पाटील म्हणाले,‘तुम्ही युती तुटली म्हणता परंतु सत्तेत आल्यापासून गेल्या चार वर्षात आमची युती होती कुठे..? आम्ही एकही निवडणूक एकत्र लढलेली नाही.
(...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील)
पालघर लोकसभेच्या पोटनिवडणूकीमुळे दोन पक्षांत जास्त कटूता निर्माण झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खालच्या पातळीवर येऊन राजकारण केले. श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीचा विषय हा दोन पक्षांतील कौटुंबिक प्रश्न होता. वनगा कुटुंबात गेली चाळीस वर्षे सत्तेची पदे आहेत.
श्रीनिवास वनगा यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत. संघामुळेच त्यांचे शिक्षण झाले. इतके उपकार असतानाही ते आपल्यावर अन्याय झाला म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे रडत गेले. ठाकरे घराण्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून एखाद्याला उचलून आणून न्यायनिवाडा करण्याची एक परंपरा आहे. कुणावरही अन्याय झाला तर ते त्याचा निकाल त्यांच्या पद्धतीने लावतात. परंतु हा विषय दोन पक्षांशी संबंधित होता. वनगा कुटुंबात मुलास उमेदवारी द्यायची की सुनेला एवढाच प्रश्न होता.
वनगा त्यांच्याकडे न्याय मागायला गेल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून मुलग्यास उमेदवारी द्या असे सांगितले असते तरी हा प्रश्र्न मिटला असता. परंतू त्यांनी फिर्याद ऐकून घेवून थेट निकालच देवून टाकला. शिवसेनेला वनगा परत भाजपकडे जातील याची भिती होती त्यामुळेच त्यांना व त्यांच्या आईलाही शिवसेनेने दोन दिवस गायब केले होते.’
चोरलेली खुर्ची आणि शिवसेना..
उद्धव ठाकरे यांनी मैत्रीत राजकारण आणल्याची टीका करून मंत्री पाटील म्हणाले,‘शिवसेनेने केलेले राजकारण मनाला लागणारे आहे. दुसऱ्याच्या घरातील खुर्ची उचलून नेता आणि ती माझीच असल्याचा हक्क सांगण्यातला हा प्रकार आहे. शिवसेनेच्या कृत्याचा पक्षावर आघात झाला. त्यामुळेच मुख्यमंत्रीही त्वेषाने या निवडणूकीत उतरले आहेत.’