‘जी. डीं.’ची उद्या चौकशी
By admin | Published: March 27, 2016 12:55 AM2016-03-27T00:55:17+5:302016-03-27T00:55:17+5:30
लेखापालची कसून चौकशी : वारणा शिक्षक कॉलनी चोरी प्रकरण
कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील तीन कोटींची चोरी व तेथे सापडलेले एक कोटी २९ लाखांच्या बेहिशेबी रकमेप्रकरणी वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांना उद्या, सोमवारी पोलिस मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावली आहे. वारणा शिक्षण मंडळाचे लेखापाल बी. बी. पाटील यांच्याकडे शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. सचिव पाटील यांच्या चौकशीमध्ये महत्त्वपूर्ण माहिती पुढे येण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, आरोपी मैनुद्दीनचा फरार साथीदार रेहान अन्सारी हा बिहारमध्ये लपून बसला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक बिहारला रवाना झाल्याचे समजते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी मैनुद्दीन मुल्ला याने जबाबामध्ये शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील, लिपिक विजय कुंभोजकर, लेखापाल बी. बी. पाटील यांच्यासह शिपायांची नावे घेतली. या सर्वांना गेल्या आठ वर्षांपासून आपण ओळखतो. त्यांच्यातील आर्थिक व्यवहारांची गोपनीय माहिती आपल्याला होती, असेही त्याने जबाबात म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी लिपिक कुंभोजकर, लेखापाल पाटील यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांकडे यापूर्वी चौकशी करून जबाब घेतले. शनिवारी पुन्हा लेखापाल बी. बी. पाटील यांना चौकशीसाठी बोलावले. सकाळी साडेदहापासून पाटील हे पोलिस मुख्यालयातील बाकड्यावर बसून होते. त्यांच्याकडे तीन कोटींबाबत चौकशी केली. या प्रकरणात सचिव जी. डी. पाटील यांची चौकशी अद्याप झालेली नाही. त्यांना चौकशीसाठी उद्या हजर राहण्यासाठी फर्मान काढले आहे. पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याने शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तीन कोटींचा मुक्काम कोडोली पोलिस ठाण्यात
वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतून आरोपी मैनुद्दीन मुल्ला (रा. जाखले, ता. पन्हाळा) याने चोरी केलेले तीन कोटी रुपये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने सांगली पोलिसांकडून ताब्यात घेतले. ही रक्कम कोडोली पोलिस ठाण्यामध्ये सशस्त्र पोलिस बंदोबस्तात ठेवली आहे. पन्हाळा न्यायालयास पत्रव्यवहार करून न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम बँकेत भरली जाणार आहे. (प्रतिनिधी)