CoronaVirus In Kolhapur : माझी मम्मा कुठं आहे हो, मला दाखवा; छोट्याची हृदय हेलावणारी विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 10:49 AM2021-05-06T10:49:49+5:302021-05-06T10:51:33+5:30

CoronaVirus In Kolhapur : छोटी मृन्मयी अवघ्या चार वर्षांची आहे. आईशिवाय एक क्षण तिचा कधी गेला नाही. गेले दोन दिवस तिने बाबांसह सर्वांना भंडावून सोडले आहे. ती एकच विचारणा करते आहे, माझी मम्मा कुठे आहे हो, मला दाखवा.. या तिच्या प्रश्नाचे उत्तर आज कुणाकडेच नाही. कारण तिच्या मम्माला क्रूर नियतीने हिरावून नेले आहे. कोरोना काळ बनून आला व एक उमलते आयुष्य तो कुस्करून गेला. कुणाचेही मन गलबलून टाकावी अशी ही घटना आरे (ता. करवीर) येथे घडली.

Yes, show me where my mamma is; A little heart-wrenching question | CoronaVirus In Kolhapur : माझी मम्मा कुठं आहे हो, मला दाखवा; छोट्याची हृदय हेलावणारी विचारणा

CoronaVirus In Kolhapur : माझी मम्मा कुठं आहे हो, मला दाखवा; छोट्याची हृदय हेलावणारी विचारणा

googlenewsNext
ठळक मुद्देमाझी मम्मा कुठं आहे हो, मला दाखवा; छोट्याची हृदय हेलावणारी विचारणा वयाच्या तिशीतच उमलते आयुष्य कोमेजले

कोल्हापूर : छोटी मृन्मयी अवघ्या चार वर्षांची आहे. आईशिवाय एक क्षण तिचा कधी गेला नाही. गेले दोन दिवस तिने बाबांसह सर्वांना भंडावून सोडले आहे. ती एकच विचारणा करते आहे, माझी मम्मा कुठे आहे हो, मला दाखवा.. या तिच्या प्रश्नाचे उत्तर आज कुणाकडेच नाही. कारण तिच्या मम्माला क्रूर नियतीने हिरावून नेले आहे. कोरोना काळ बनून आला व एक उमलते आयुष्य तो कुस्करून गेला. कुणाचेही मन गलबलून टाकावी अशी ही घटना आरे (ता. करवीर) येथे घडली.

कोरोनाचा संसर्ग तरुणांना तितकासा धोकादायक नाही हा समज खोटा ठरवणारी ही घटना आहे. ऋतुजा शैलेश पाटील (वय ३०, रा. आरे, ता. करवीर) यांचे कोरोनामुळे सोमवारी सकाळी अहमदाबादमध्ये निधन झाले. ऋतुजा ही दत्त आसुर्ले-पोर्ले कारखान्याचे संस्थापक संचालक असलेले दिवंगत दिनकर बळवंत पाटील (रा. आकुर्डे, ता. पन्हाळा) यांची नात व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांची नात्याने भाची. परंतु, त्यांनी तिला मुलीसारखे वाढवलेलं.. तिचे लग्न २०१४ ला आरे (ता. करवीर) येथील शैलेश पाटील यांच्याशी झाले.

गावचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांचा तो मुलगा. एम.टेक झालेला. त्याला दोन वर्षांपूर्वी अदानी ग्रुपमध्ये अहमदाबादला नोकरी मिळाली. एक कुटुंब सुखाने डोलू लागलं. चार वर्षांपूर्वी त्यांना कन्या झाली. सगळे कसे आनंदात आयुष्य चालले होते. एप्रिलमध्ये कोरोनाच्या लाटेत शैलेशला प्रथम संसर्ग झाला. त्याने ऋतुजाचीही तपासणी करून घेतली.

ती पॉझिटिव्ह आली. परंतु, प्रकृती एकदम चांगली होती. तपासण्या, औषधोपचार व्यवस्थित सुरू होते. गेल्या शनिवारपासून तिला श्वास घ्यायला जास्त त्रास सुरू झाला. रविवारी सायंकाळी ती फोनवर कुटुंबीयांशी बोलली. परंतु, रात्रीत असे काय घडले आणि सोमवारी (दि. ३ मे) सकाळी तरी सगळं संपले. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. तिथेच अंत्यसंस्कार करून बुधवारी आरे येथे रक्षाविसर्जन करण्यात आले. सुट्टीला येतो असे सांगून गेलेली ऋतुजा आता न परतीच्या वाटेने निघून गेली. खरंच नियतीही इतकी निष्ठूर का वागत असेल..?

 

Web Title: Yes, show me where my mamma is; A little heart-wrenching question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.