योगसुखाचे सोहळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:45 PM2019-03-31T23:45:09+5:302019-03-31T23:45:14+5:30

इंद्रजित देशमुख दैवी गुणांबद्दल आपल्या पाठीमागील चिंतनामध्ये आपण ज्ञान या दैवी गुणाबद्दल, योग्य आणि अचूक योजनाद्वारे ज्ञान माणसाच्या जीवनात ...

Yog Sukha Functions | योगसुखाचे सोहळे

योगसुखाचे सोहळे

Next

इंद्रजित देशमुख
दैवी गुणांबद्दल आपल्या पाठीमागील चिंतनामध्ये आपण ज्ञान या दैवी गुणाबद्दल, योग्य आणि अचूक योजनाद्वारे ज्ञान माणसाच्या जीवनात किती मोठे परिवर्तन घडवू शकते याचे चिंतन केले होते. या सकारात्मक विनियोजनाने आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचता येते म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये स्वस्वरूपदर्शीत्वाच्या बोधापर्यंत पोहोचू शकतो आणि आलेल्या बोधानिशी सतत जागृत राहू शकतो याचंच नाव योग असे सांगितलेले आहे. या दैवी गुणाला सर्व गुणांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग हा एक विषय साधला की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप साधतात, म्हणून जीवनामध्ये योगसाधना किंवा योग साधत असेल आणि आपण त्यासाठी अतीव प्रयत्न करत असेल तर अशा या अंतर्मुखी कृतीत अनन्य साधारण भावाने वास्तव्य करणाऱ्यास योगी म्हणतात.
योग या शब्दाचा अर्थ जुळणे किंवा एकत्र येणे असा आहे. तसे या शब्दाच्या अनुरोधाने पाहिले तर कितीतरी गमतीदार गोष्टी आपल्यात घडत असतात म्हणूनच काही इच्छेचे, तर काही अनिच्छेचे योग आपल्या जीवनात येत असतात. एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्नशीलतेमुळे ती गोष्ट प्राप्त झाल्याचा योग जीवनात येतो, तर कधी खूप प्रयत्न करूनदेखील अपयश पदरी येण्याचा योगही येतो. एखाद्या चिरकाल लक्षात राहण्यासारख्या प्रसंगाला अनपेक्षितपणे उपस्थित राहण्याचा आलेला योग देखील असाच येत असतो किंवा एखादी भेटणार नाही किंवा भेटली तर अजिबात आपल्याकडे ढुंकून पाहणार देखील नाही अशी व्यक्ती आपल्याला अचानक भेटते आणि आपल्यासाठी खूप वेळही देते हा देखील एक योगच असतो. इथे योग याचा तो अर्थ अपेक्षित नाही. मग योग या शब्दाच्या अनुरोधाने आपण देहसंसाधन संपन्नतेसाठी जो योग अनुभवतो, त्या योगाचा विचार करावा तर माउली आपल्या हरिपाठात एके ठिकाणी म्हणतात की, ‘योग योग विधी येणे नोहे सिद्धी’. या योगाच्या अनुनयाने आम्ही तुकोबारायांनी सांगितलेल्या
आयुष्याच्या साधने।
सच्चीदानंद पदवी घेणे।
या आमच्या मूळ ध्येयप्राप्तीच्या सिद्धतेपर्यंत आम्हाला कधीच पोहोचू शकत नाही. आणि त्यातूनही आपण आपल्या अंगच्या धैर्याने प्रयत्न केला तर माउलींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या वाटणीला
‘योगचिया वाटा ।
जे निघाले गा सुभटा।
तया दु:खाचाची किर सेल वाटा।
भागा आला।।’
अशी आमची अवस्था होऊ शकते. या सगळ्या चिंतनाचा विचार करता आमच्या मनात प्रश्न पडतो की, मग नेमकं योग या दैवी गुणाला संपादित करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. या प्रश्नाची उकल करताना
समत्व चित्ताचे।
तेचि सार जाण पा योगाचे।।
या संतवचनाप्रमाणे आमच्या चित्तात तुकोबारायांनी सांगितलेल्या
आणिक दुसरे मज नाही आता।
नेमिलिया चित्ता पासोनिया।।
या वचनातील अपेक्षेप्रमाणे आपल्या चित्तात अत्युच्च दर्जाचे समत्व धारण करणं म्हणजेच योग साधना होय. आम्ही संपादित केलेल्या साधनेने आमच्या स्वस्वरूपाच्या जाणिवेत सतत रत राहणं, त्यात निरंतरता असणं, त्या जाणीवसहित जगण्यात अखंडता असणं यालाच योग असे म्हणतात. पण हे सगळं साधण्यासाठी आम्ही आमचं चित्त निर्मळ करायला हवं. चित्ताची निर्मळता झाली की स्वस्वरूप अनुसंधानाच्या सतत जाणिवेत राहायला आम्हाला काहीच अडचण नाही. म्हणून तर चित्त निर्मळ करण्याचा आग्रह तुकोबाराय करत आहेत. त्याचसाठी त्यांनी कधी
तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ।
येऊनि गोपाळ राहे तेथे।।
असं म्हटलं आहे, तर कधी
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती।
व्याघ्रही न खाती सर्प तया।।
असंही सांगितलं आहे.
वरील संतवाक्यांचा विचार केला तर आमच्या असं लक्षात येईल की, आम्ही आमच्या साधना मार्गामध्ये चित्तशुद्धतेसाठी आवश्यक असणारे योग्य असे प्रयत्न सोडून जर इतरच प्रयत्न करत असेन, तर आम्ही योगात असून वियोगात राहू शकतो आणि याच्या बरोबर उलट एखाद्याने सहजगत्या चित्तशुद्धभाव जोपासला असेल आणि तो आपल्यासारखी दार्शनिक साधना करत नसेल तर आपल्या लेखी तो वियोगात असेल; पण त्याच्या अंगीकृत चित्तशुद्धभावाच्या बळावर तो खऱ्या अर्थाने योगात असेल किंवा योगी असेल आणि खºया अर्थाने माउलींनी सांगितलेल्या
अग्निसेवा न सांडिता।
कर्माची रेखा नोलांडिता।
आहे योगसुख स्वभावता।
आपणपाची।।
या वचनाप्रमाणे तो योगी योगसुखाचे सोहळे अनुभवत नित्य तृप्ततेत वास करत असेल. या सगळ्यामुळे त्याचं अवघं जगणंच एक आनंददायी सोहळा किंवा महोत्सव झालेले असेल. त्याच्या प्रत्येक क्षणावर आनंदाचाच वर्षाव होत असेल आणि नामदेव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ‘विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी’ अशा नित्य सुखाच्या शेजेवर तो पहुडलेला असेल. या चिंतनाने ते सुख आपल्या सगळ्यांच्या पदरी यावं एवढीच कृपाभिलाषा.
(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत.)

Web Title: Yog Sukha Functions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.