बिंदू चौक सबजेलमधील कैद्यांचा योगाभ्यास; ताण-तणाव कमी होण्यास मदत
By उद्धव गोडसे | Published: April 14, 2024 02:08 PM2024-04-14T14:08:26+5:302024-04-14T14:09:31+5:30
आर्ट ऑफ लिव्हिंगमार्फत प्रशिक्षण शिबिर,
उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कैद्यांमधील मानसिक ताण-तणाव कमी होऊन ते गुन्ह्यांपासून परावृत्त व्हावेत, यासाठी बिंदू चौक सबजेलमध्ये योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. शनिवारपासून (दि. १३) शिबिराला सुरुवात झाली असून, आठवडाभर चालणा-या शिबिरातून कैद्यांना तणावमुक्त केले जाणार आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक सचिन साळवे यांनी दिली.
कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या सूचनेनुसार कारागृहातील कैद्यांच्या मानसिक आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. गुन्हा करून कारागृहात पोहोचलेल्या कैद्यांचे मनपरिवर्तन होऊन त्यांच्या वर्तनात सुधारणा व्हावी, यासाठी बिंदू चौक सबजेलमध्ये कैद्यांसाठी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. कारागृह अधीक्षक सचिन साळवे यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी शिबिराचे उद्घाटन झाले.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक राहुल नार्वेकर आणि पद्मनाभ देशपांडे हे कैद्यांना प्रशिक्षण देत आहेत. यावेळी अधीक्षक साळवे यांनी योग आणि प्राणायाम याचे महत्त्व स्पष्ट केले. कारागृहातील सर्व कैद्यांनी प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला असून, तणाव कमी होण्यास मदत होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. १४ एप्रिलपर्यंत शिबिर चालणार असल्याची माहिती अधीक्षक साळवे यांनी दिली.