‘गोकुळ’च्या व्यवस्थापकीय संचालक पदी योगेश गोडबोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:39+5:302021-08-23T04:27:39+5:30
(फोटो-२२०८२०२१-कोल-योगेश गोडबोले) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) व्यवस्थापकीय संचालक पदी योगेश गोपाळ ...
(फोटो-२२०८२०२१-कोल-योगेश गोडबोले)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) व्यवस्थापकीय संचालक पदी योगेश गोपाळ गोडबोले यांचे नाव रविवारी निश्चित केले. निवड समितीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे नावे दिली होती, त्यातून गोडबोले यांचे नाव निश्चित करण्यात आले. गोडबोले हे सध्या ‘सायबर डायनामिक्स’ डेअरी बारामती येथे कार्यरत आहेत.
डी. व्ही. घाणेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी अर्ज मागवल्यानंतर व्यवस्थापकीय संचालक पदासाठी २१ अर्ज आले होते. निवड समितीने दिलेल्या नावांवर रविवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी संचालक मंडळाच्या उपस्थितीत पुन्हा मुलाखती घेतल्या. यामध्ये योगेश गोडबोले यांचे नाव निश्चित केले आहे. येत्या दोन दिवसात गोडबोले यांना नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. त्याचबरोबर मार्केटिंग व्यवस्थापक पदी समीर बाळकृष्ण गरुड (कराड) यांची नियुक्ती केली आहे.
योगेश गोडबोले हे मूळचे बार्शी (जि. सोलापूर)चे आहेत. नोकरी निमित्त ते अहमदनगर येथेच स्थायिक झाले. त्यांनी आतापर्यंत पाच नामवंत दूध संघात काम केले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत या नावांना मंजुरी घेऊन त्यांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत.
गोडबोले यांची सुरुवात ‘बारामती मिल्क’ मधून
योगेश गोडबोले यांनी २५ सप्टेंबर १९९४ ला बारामती मिल्क मध्ये डेअरी केमिस्ट म्हणून सुरुवात केली. त्यानंतर निसर्ग फूड प्रा. लि. येथे डेअरी मॅनेजर, राजारामबापू दूध संघ येथे शिफ्ट इन्चार्ज, सोलापूर मिल्क प्रोडक्ट येथे डेअरी एक्झिक्युटीव्ह, सायबर डायनामिक्स बारामती येथे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले.
‘गोकुळ’चे नूतन व्यवस्थापकीय संचालक..
नाव : योगेश गोपाळ गोडबोले
मूळ गाव : बार्शी (जि. सोलापूर), सध्या अहमदनगर.
जन्म तारीख : १८ नोव्हेंबर १९७४
शिक्षण : बी. ए., एम. ए., एम. बी.ए. , एम. फील, डेअरी डिप्लोमा.
अनुभव : बारामती मिल्क, सोलापूर मिल्क प्रोडक्ट, राजारामबापू, निसर्ग फूड व सायबर डायनामिक्स येथे विविध पदावर काम
व्यवस्थापकीय संचालक पदासाठी यांच्यात होती रस्सीखेच
योगेश गोडबोले (अहमदनगर)
मनोज लिमये (जळगाव)
अशोककुमार सिंग (ठाणे)
एस. व्ही. चौधरी (गुजरात)
कोट-
दोन्ही पदासाठी मुलाखती झाल्यानंतर व्यवस्थापकीय संचालक पदी योगेश गोडबोले व मार्केटिंग व्यवस्थापक पदी समीर गरुड यांची निवड करण्यात आली. संचालक मंडळात मंजुरी घेऊन नियुक्तीपत्रे देणार आहे.
- विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ)