तू माझ्या नातवासारखा, माझ्या मुलाएवढाच मोठा हो..!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 05:35 AM2019-05-30T05:35:12+5:302019-05-30T05:35:39+5:30

हातकणंगलेचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी ‘स्वाभिमानी’चे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील घरी जाऊन मातोश्री रत्नाबाई शेट्टी यांचे आशीर्वाद घेतले.

You are just like my grandfather, my son ..! | तू माझ्या नातवासारखा, माझ्या मुलाएवढाच मोठा हो..!

तू माझ्या नातवासारखा, माझ्या मुलाएवढाच मोठा हो..!

Next

शिरोळ (जि.कोल्हापूर) : लोकसभा निवडणुकीचा निकाल संपल्यानंतर द्वेषाच्या राजकारणाला मूठमाती देत हातकणंगलेचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी ‘स्वाभिमानी’चे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील घरी जाऊन मातोश्री रत्नाबाई शेट्टी यांचे आशीर्वाद घेतले. ‘माझ्या नातवासारखा आहेस, मनात काही न घेता काम करत राजू शेट्टींएवढा मोठा हो’ असा आशीर्वादही रत्नाबाई यांनी दिल्याने घरातील वातावरण चांगलेच भावनिक झाले. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत असे कधीही पाहायला मिळाले नाही. पण या निवडणुकीत प्रतिस्पर्धी नेत्यांमध्ये टोकाची इर्ष्या पाहायला मिळाली असताना विरोधकाच्या घरी जाउन प्रतिस्पर्ध्यांची भेट घेत एक वेगळाच संदेश माने यांनी दिला आहे. धैर्यशील माने सुद्धा माझ्या नातवासारखे आहेत, जसे काम माझ्या मुलाने केले तसेच काम आणि त्याहूनही अधिक चांगले काम तुम्ही करा, असा आशीर्वाद शेट्टींच्या आईंनी माने यांना दिला.

तुम्हाला भेटायला म्हणून मी खास आलोय, असे माने राजू शेट्टी यांच्या आईचे पाया पडून आशिर्वाद घेताना म्हणाले. आशिर्वाद माझा भरपूर आहे, माझा मुलगा जसा केला, तसे कर, माझा आशिर्वाद मोठा आहे, असा आशिर्वाद त्यांनी दिला. तुमच्या आशिर्वादाने सगळेच चांगले होतेय, तुमचा आशिर्वाद असल्यावर काही कमी पडणार नाही, असे माने यांनी सांगितले.यावेळी शेट्टी यांनीही माने यांना लोकसभेमध्ये चांगले प्रश्न मांडावेत असा सल्ला दिला. माझ्या घरी आल्यामुळे मला खूप आनंद झाला, जनतेने दिलेला कौल स्वीकारला पाहिजे, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.यावेळी फेटा बांधून पुष्पगुच्छ देत राजू शेट्टी यांनी धैर्यशील माने यांचा सत्कार केला. राजू शेट्टी यांच्या घरात यावेळी माने यांचे औक्षणही केले. या भेटीप्रसंगी धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि राजू शेट्टी यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

Web Title: You are just like my grandfather, my son ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.