तुम्ही तर औरंगजेबापेक्षाही क्रुर, राजू शेट्टी यांचा सरकारवर हल्लाबोल

By विश्वास पाटील | Updated: March 19, 2025 13:18 IST2025-03-19T13:17:30+5:302025-03-19T13:18:00+5:30

शेतकरी विरोधी धोरण राबवण्याविरुद्ध लढा

You are more cruel than Aurangzeb, Raju Shetty attacks the government | तुम्ही तर औरंगजेबापेक्षाही क्रुर, राजू शेट्टी यांचा सरकारवर हल्लाबोल

तुम्ही तर औरंगजेबापेक्षाही क्रुर, राजू शेट्टी यांचा सरकारवर हल्लाबोल

कोल्हापूर : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श दररोज ऐकवणारे प्रत्यक्षात मात्र शेतकरी विरोधी धोरणे राबवून औरंगजेबपेक्षा क्रूर वागत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची स्मशानभूमी बनत आहे असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी एका पत्रकाद्वारे राज्यकर्त्यांच्यावर केला.

महाराष्ट्रातील पहिला शेतकरी साहेबराव करपे यांनी आत्महत्या केली त्यांचा १९ मार्च हा स्मृतीदिन आहे.  प्रगतीशील शेतकरी असलेले साहेबराव करपे हे अथक प्रयत्न करूनही कर्जातून बाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे वर्धा येथील गांधी आश्रमात जाऊन महात्मा गांधीचे दर्शन घेऊन कुटूंबियासाहित आत्महत्या केली. ही महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या त्यानंतर महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या सगळ्या प्रमुख पक्षाचे सरकारे येवून गेली. पण परिस्थती काही सुधारली नाही.      

कोरोना काळात जगाची चाके थांबली होती. पण शेतीने जगाला आणि देशाला तारले. तरीही राज्यकर्त्यांना याची जाण नाही. गेल्या पाच वर्षात कृषीप्रधान देशातील ६ लाख ४२ हजार हेक्टर तर राज्यातील पिकाखालील ३ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र कमी झाले. गेल्या पाच वर्षात १५ हजार ८२४ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. पण महाराष्ट्रातील राजकीय सर्वच राजकीय पक्षांना या दाहक वास्तवापेक्षा औरंगजेबाची कबर, खोक्या, बोक्या,आका यातच रस आहे, असे जळजळीत वास्तवही पत्रकात नमूद केले आहे. 

पुण्याकडे ज्यावेळेस शाहिस्तेखान  चालून येतो आहे, असे शिवरायांना गुप्तहेरांनी सांगितले. त्यावेळेस त्यांनी सर्जेराव जेधे यांना कळविले की, शेतकर्‍यांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवा, या कामात हयगय केली तर पातक लागेल. म्हणजे शेतकर्‍यांचे हित जोपासणे हे पुण्य आहे, तर शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणे पाप आहे, अशी शिवरायांची शेतकर्‍यांप्रती भूमिका होती. शेतकर्‍यांचे हित हेच राज्याचे हित, हे शिवरायांचे धोरण होते, याची आठवण ठेवा असाही इशारा शेट्टी यांनी दिला. 

शेतक-यांचा कवट्यांचा हार 

कुठे फेडाल हे पाप. तुमच्या या दळभद्री धोरणामुळेच महाराष्ट्र ही शेतक-यांची स्मशानभूमी झाली आहे. राज्यकर्त्यांनो तुम्ही तर औरंगजेबापेक्षाही क्रुर वागत आहात, अशी खंत व्यक्त करून, जरा तरी लाज बाळगा नाहीतर पुढची पिढी आत्महत्याग्रस्त शेतक-यांचा कवट्यांचा हार घालून तुम्हाला जोड्याने हाणल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: You are more cruel than Aurangzeb, Raju Shetty attacks the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.