तुम्ही एकटे नाही; सर्व महाराष्ट्र तुमच्या मागे उभा; शरद पवार यांच्याकडून पुरग्रस्तांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 05:26 PM2019-08-15T17:26:37+5:302019-08-15T17:27:31+5:30

चिखली, आंबेवाडी, बापट कँप, कुंभारगल्ली येथील पूरग्रस्तांशी साधला संवाद

You are not alone; All Maharashtra stands behind you; Sharad Pawar gives relief to the flood victims | तुम्ही एकटे नाही; सर्व महाराष्ट्र तुमच्या मागे उभा; शरद पवार यांच्याकडून पुरग्रस्तांना दिलासा

तुम्ही एकटे नाही; सर्व महाराष्ट्र तुमच्या मागे उभा; शरद पवार यांच्याकडून पुरग्रस्तांना दिलासा

googlenewsNext

कोल्हापूर : प्रलयकारी महापुरात होत्याचे नव्हते झालेल्या पूरग्रस्तांची भेट घेऊन, ‘तुम्ही एकटे नसून तुमच्या मागे सर्व महाराष्ट्र उभा आहे’ असा दिलासा गुरुवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे दिला. तसेच नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी कर्जमाफीसह आर्थिक मदतीचीही मागणी केंद्र व राज्य सरकारकडे करू, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. 


पवार यांनी गुरुवारी पूरबाधित असलेल्या करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी, वरणगे पाडळी या गावांसह शहरातील शाहुपुरी कुंभार गल्ली, बापट कँप येथील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, करवीर पंचायत समिती राजू सुर्यवंशी आदी उपस्थित होते.


आंबेवाडी येथील मारुती मंदीर येथे पूरग्रस्तांशी खा. पवार यांनी संवाद साधला. यावेळी सरपंच सिकंदर मुजावर म्हणाले, पुरामुळे बाधित झालेली मातीची घरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही घरे पंतप्रधान आवास योजनेतून बांधून द्यावीत.


खा. पवार यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधत घरात ओल आली असेल तर तुम्ही राहता कुठे? अशी विचारणा केली. तेव्हा आम्ही सध्या कोल्हापूरातील बुधवार पेठेत तात्पुरते स्थलांतरीत असल्याचे पूरग्रस्तांनी सांगितले. पुरामुळे कुणाची घरे पडली आहेत त्यांनी हात वर करावा असे सांगितले. यावर बहुतांश जणांनी हात वर केले. त्यावर खा. पवार यांनी आंबेवाडीतील लोकांचे पुनर्वसन झाले आहे मग तिथे जायला काय अडचण आहे ,अशी विचारणा केली. तेव्हा ग्रामस्थांनी त्या ठिकाणी वीज नाही, प्रॉपर्टी कार्डला नावे लागलेली नाहीत. अशा विविध कारणांमुळे स्थलांतर झाले नसल्याचे सांगितले. यावर खा. पवार यांनी तुमची तेथे राहायला जायची तयारी असेल तर आम्ही सरकारकडे याबाबत मागणी करु, असे सांगितले.


ऊसाच्या स्थितीबाबतही पवार यांनी विचारणा केल्यावर येथील बहुतांश सर्वच ऊस पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात आले. त्यावर ऊरलेल्या ऊसाबाबत आडसाळी लागवडीबाबत काय करता येईल, याच्या मार्गदर्शनासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटयुटच्या तज्ज्ञांच्या दहा टीम येथे येणार आहे. तसेच ४० हजार एकरात तयार केलेल्या ऊसाच्या बियाणाचाही वापर केला जाईल, असे पवार यांनी सांगितले. तुम्ही एकटे नसून सर्व महाराष्ट्र तुमच्या मागे आहे. त्यामुळे धीर सोडू नका, पुन्हा उभारा अशा शब्दात दिलासा दिला.


यानंतर चिखली येथे भेट देऊन पूरग्रस्थांशी चर्चा केली. सरपंच उमा पाटील, माजी जि.प. सदस्य एस. आर. पाटील, पोलिस पाटील अरुणा दळवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. एस.आर. पाटील यांनी पुनर्वसन झालेल्या जागेवर जाण्यास आमची काहीच अडचण नाही शेतीचे काय? अशी भावना व्यक्त करत पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी केली. यावर पवार यांनी पहिल्यांदा राहण्याचा प्रश्न महत्वाचा असून तुमची तयारी असेल तर आम्ही याबाबत सरकारशी चर्चा करु असे सांगितले. तसेच येथील शेतकऱ्यांचे सर्व कर्जमाफ करावे, त्यांना उभे करण्यासाठी आर्थिक मदती करावी, अशी मागणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यानंतर पवार यांनी वरणगे पाडळी, बापट कँप येथे जाऊन पूरग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी सरपंच अनिता कांबळे, सदस्य शिवाजी गायकवाड, शिवाजी पाटील, पोलिस पाटील महादेवी कांबळे आदी उपस्थित होते.

दौऱ्यात नरके-पीएन एकत्र
राजकीय विरोधक असलेले करवीरचे आमदार चंद्रदीप नरके व माजी आमदार पी. एन. पाटील हे शरद पवार यांच्या दौऱ्यात एकत्र होते. संपूर्ण दौऱ्यात जाईल त्या गावात ते पवार यांच्या आजबाजूला असल्याचे दिसत होते.
 

Web Title: You are not alone; All Maharashtra stands behind you; Sharad Pawar gives relief to the flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.