पंचगंगा नदीघाटावर आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 04:43 PM2020-06-10T16:43:10+5:302020-06-10T17:02:11+5:30
यंदाचा पावसाळा व संभाव्य पूरस्थिती पाहता प्रशासनाच्या सज्जतेसाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनाकरिता उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीची बुधवारी पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली.
कोल्हापूर : यंदाचा पावसाळा व संभाव्य पूरस्थिती पाहता प्रशासनाच्या सज्जतेसाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनाकरिता उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीची बुधवारी पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली.
सज्ज आहातच; पण आता दक्ष रहा, असा संदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बुधवारी आपत्ती व्यवस्थापन समितीला दिला. गतवर्षी अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात महापालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले, अशी कौतुकाची थापही त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीवर दिली. त्यावेळी आयुक्त बोलत होते.
अग्निशमन दलातर्फे रेस्क्यू बेल्ट, बीए सेट, पोर्टेबल पंप, फायर सुट, लाईफ जॅकेट, सेफ्टी नेट, लिफ्टिंग बॅग, हायड्रॉलिक स्प्रेडर कटर व जॅक, सॉ कटर, स्लॅब कटर, लाईफबॉय, मनिला रोप, फ्लोटिंग पंप, रबरी बोटी, लाईफ रिंग, इत्यादी साहित्याची पंचगंगा घाटावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.
अग्निशमन विभागाच्या जवानांनी शोध व बचाव कसा करावा, बुडणाऱ्या व्यक्तींना कसे वाचवावे याची प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर यांनी मागील वर्षीचा पुराचा अनुभव पाहता या वर्षी महापालिकेने खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या असल्याचे सांगितले.
गतवर्षी पूरपरिस्थितीमध्ये अनेक सेवाभावी संस्था, नागरिकांनी सहकार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे या वर्षीही संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.
यावेळी उपायुक्त निखिल मोरे, साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, चेतन कोंडे, मुख्य अग्निशमन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजित चिले, स्थानक अधिकारी तानाजी कवाळे, मनीष रणभिसे, दस्तगीर मुल्ला, आश्पाक आजरेकर व अग्निशमन विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
दहा बोटी, ७५ लाईफ जॅकेट्स
आयुक्त कलशेट्टी म्हणाले, महापालिकेकडे सात बोटी आहेत. आणखी तीन बोटी खरेदी करण्यात येत आहेत. त्या लवकरच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे दाखल होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ७५ लाईफ जॅकेट घेतली आहेत. त्याचबरोबर संभाव्य पूर परिस्थती पाहता पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी नदीची इशारा पातळी ओलांडता जाताच तत्काळ स्थलांतरित व्हावे.