तुम्ही फक्त जय म्हणा!

By admin | Published: February 7, 2017 11:15 PM2017-02-07T23:15:58+5:302017-02-07T23:15:58+5:30

तुम्ही फक्त जय म्हणा!

You just say yes! | तुम्ही फक्त जय म्हणा!

तुम्ही फक्त जय म्हणा!

Next


श्रीनिवास नागे
वर्षभरापूर्वीचा काळ असावा. वाळवा तालुक्यातल्या एका गावात सभा सुरू होती. सदाभाऊ खोत बोलायला उभे राहिले. भाषेचा ग्रामीण लहेजा. रांगडा बाज. त्याला जोड म्हणून अस्सल गावपांढरीतली उदाहरणं. त्यामुळं भाऊंच्या भाषणाला गर्दी उसळलेली. भाऊ प्रस्थापित पुढाऱ्यांवर घसरतात. घसरत-घसरत घराणेशाहीवर येतात. नेते अन् त्यांच्या वारसदारांवर तोंडसुख घेतात, ‘अरं, सत्तेची फळं तुमाला आनी तुमच्या घरातल्यांनाच चाखायला पाह्यजेत व्हय... सामान्य कार्यकर्त्याच्या आया बाळांतीण झाल्या न्हाईत काय?’
सदाभाऊंच्या सडेतोड सवालानं जमलेले कार्यकर्ते, तरणी पोरं, बाया-बापड्या खूश. शिट्ट्या अन् टाळ्यांचा पाऊस पडतो. भाषण रंगत जातं. भाऊंचा सगळा रोख घराणेशाहीवरच असतो...
...अन् सोमवारी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वाळवा तालुक्यातल्या बागणी गटातून भाऊंच्या चिरंजीवांची उमेदवारी जाहीर झाली. ही कार्यकर्त्यांची वानवा, की सत्तेची फळं घरातच राहण्यासाठी पाहिलेली सोय? ज्या रयत विकास आघाडीला भाऊंनी जन्माला घातलं, त्या आघाडीतून भाऊंचे चिरंजीव लढताहेत. घराणेशाहीचा वारसा तिसऱ्या पिढीत कसोशीनं जपणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या मुलाविरोधात!
उमेदवारी जाहीर झाली... मग सुरू झाला, सोशल मीडियातल्या पोस्टस्चा भडीमार. ‘भाऊ, आता कुठं गेली घराणेशाहीवरची टीका?’, ‘आता का गप्प आहात? तुमच्या कार्यकर्त्यांनीही नुसत्या सतरंज्याच उचलायच्या का?’, ‘तुम्हीही प्रस्थापितांच्या वळचणीला जाऊन तथाकथित प्रस्थापितच बनला काय?’ अशा पोस्ट फिरू लागल्या. (नतद्रष्ट सगळे. भाऊ, असल्या पोस्टकडं बिलकूल लक्ष द्यायचं नसतं हं..!)
भाऊंच्या चिरंजीवांची उण्यापुऱ्या तीन-चार महिन्यांची राजकीय कारकीर्द. तीही डिजिटलवर झळकण्यापुरती. ज्या परिसरानं त्यांना धडपणानं पाहिलं नाही, ऐकलं नाही, अशा परिसरातून ते लढताहेत. (भाऊ नाही का, लोकसभेला माढ्यातून लढले!) संघर्षातून घडलेल्या चळवळ्या नेत्याचा हा वारसा.
सदाभाऊ अन् स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी आता बागणी-आष्टा भागातल्या सभा पुन्हा गाजवतील. तडाखेबंद भाषणे ठोकतील, तरण्या पोरांचं रक्त सळसळायला लावतील, प्रस्थापितांवर घसरतील, टाळ्या मिळवतील...
पण त्यात नसेल फक्त घराणेशाहीचा मुद्दा...
---------------------------
सांगली जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या नाड्या जयंत पाटील यांच्या हातात आहेत, पण त्या हल्ली सैल झाल्यात. त्यांच्याकडून भाजपकडं जाणाऱ्यांची रीघ संपता संपेना. राजकारणातले अन् प्रत्यक्षातलेही ‘टेक्नोसॅव्ही’ अशी इमेज असणाऱ्या जयंतरावांना हे ‘आऊटगोऊंग’ रोखता येत नसल्याचं दिसतंय. एकेकाळी (अगदी आता-आतापर्यंत) ‘जेजेपी’ चालवणाऱ्या जयंतरावांना ‘बीजेपी’नं हैराण केलंय. हतबल झालेत ते. राजकारणावरची त्यांची मांड निसटू लागलीय. राजकारणातली ही असुरक्षितता मेंदू कुरतडू लागते, तेव्हाही घराणेशाहीच आधाराला येते बहुदा. इस्लामपूर मतदारसंघातल्या जिल्हा परिषद गटांत कोंडी करण्याचा बेत विरोधकांच्या तंबूत शिजत असताना ती कोंडी फोडण्यासाठी जयंतरावांनी आपल्या घराचाच आधार घेतलाय. चुलत चुलत बंधू जनार्दनकाकांच्या घरातच त्यांनी तीन तिकिटं दिलीत. जनार्दनकाका हे कासेगाव परिसरातले मातब्बर नेते. त्यांच्या कन्येला कासेगाव जिल्हा परिषद गटातून, त्यांचे चिरंजीव देवराज यांना कासेगाव गणातून अन् त्यांच्या भगिनीला वाटेगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी जयंतरावांनी बहाल केलीय. मागे सांगली महापालिकेच्या निवडणुकीत महाआघाडी केल्यानंतर त्यांनी मिरजेच्या नायकवडी घराण्यात तीन तिकिटं दिली होती. शिवाय काँग्रेसनंही नायकवडींपैकी दोघांना उमेदवारी दिली होती! तब्बल पाच तिकिटं मिळवणाऱ्या या घराण्याचं ‘इलेक्टिव्ह मेरिट’ जयंतरावांनी हेरलं होतं. (नंतर नायकवडींनी त्यांना मिरजेचं पाणी पाजलं, ही गोष्ट अलाहिदा!) पण आता जयंतरावांचं ‘इलेक्टिव्ह मेरिट’ आता ‘सिलेक्टिव्ह’ झालंय...
वर्षानुवर्षं सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते आणखी काही वर्षं सतरंज्याच उचलणार...
---------------------------
एक जुना किस्सा. एका शैक्षणिक संस्थेतला.
वसंतदादा पाटील भाषण संपवून मंचावरून उतरले. विशीतला एक विद्यार्थी सामोरा आला अन् म्हणाला, ‘दादा तुमचे विचार मला पटलेत. मी तुमच्या पक्षात काम करू इच्छितो.’
दादांनी त्याच्या खांद्यावर हात टाकला अन् उत्तरले, ‘मित्रा, अगोदर शिक्षण घे. पोटाचा प्रश्न सोडव. मग चळवळीत-पक्षकार्यात ये. उपाशीपोटी बनलेला कार्यकर्ता लाचार बनतो..!’

Web Title: You just say yes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.