तुम्ही सभापती बसवा; आम्ही विकास दाखवतो
By Admin | Published: February 1, 2017 11:09 PM2017-02-01T23:09:53+5:302017-02-01T23:09:53+5:30
प्रमोद जठार : प्रचार कार्यालयाचे उद्घाटन; काँग्रेसला सत्तेपासून रोखण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन
वैभववाडी : वैभववाडीच्या विकासाची प्रतीक्षा संपविणारी ही निवडणूक आहे. आपला शत्रू मोठा आहे. त्यामुळे गर्व, मानापमान विसरून दोन पावले मागे घेत ज्या तडजोडी कराव्या लागतील त्या करा, पण काँग्रेसला सत्तेपासून रोखा. ही लढाई तुमच्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला सभापती बसवून दाखवा, आम्ही तुम्हाला विकास दाखवतो, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले.
येथील अ. रा. विद्यालयाशेजारी प्रमोद रावराणे यांच्या इमारतीत भाजपचे प्रचार कार्यालय सुरू केले. त्यानिमित्त तेथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष युवानेते संदेश पारकर, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, ज्येष्ठ नेते बंडू मुंडल्ये, तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, माजी शिक्षण सभापती अरुण मुरकर, माजी सभापती दीपक पांचाळ, रंगनाथ नागप, सीमा नानिवडेकर, हिरा पाटील, राधिका शेळके, उषा गवळी, सुधीर नकाशे, शहराध्यक्ष रणजित तावडे, नवनाथ गुरव, आदी उपस्थित होते.
प्रमोद जठार पुढे म्हणाले की, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी घराघरांत पोहोचले, परंतु आपण अद्यापही आपल्या गावात जनतेपर्यंत पोहोचू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करून तुम्ही तुमचा बूथ जिंकला तर वैभववाडी जिंकाल याची खात्री देतो, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
ते म्हणाले की, केवळ भाजपचे लोकप्रतिनिधी वाढविणे हे आमचे ध्येय नाही, तर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावागावांत विकास पोहोचवणे हे अंतिम लक्ष आहे. त्यामुळे जेवढे जास्त लोकप्रतिनिधी निवडून द्याल, तेवढा जास्त विकासनिधी तुमच्या गावात खर्च होणार आहे. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून विकासाची आणि प्रतिष्ठेची लढाई लढताना मस्तीत अजिबात गाफील राहू नका, असे आवाहन जठार यांनी कार्यकर्त्यांना केले.
संदेश पारकर म्हणाले की, निवडणुकीच्या पहिल्या प्रचार कार्यालयाचा मान वैभववाडीने मिळवला हा चांगला संदेश जिल्ह्यात जाईल. केंद्र व राज्यातील सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद ताब्यात असली पाहिजे. बहुतेक सत्ताकेंद्रे राणे काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र, जनतेला त्याचा उपयोग झाला नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी लुटीचे ध्येय ठेवूनच राजकारण केले. त्यामुळे भ्रष्टाचार वाढला. त्यातूनच त्यांची श्रीमंती आली. १५ वर्षांपूर्वी सायकल नव्हती त्यांच्याकडे आलिशान गाड्या आल्या. त्यामुळे जनता काँग्रेसला कंटाळली असून, लोक परिवर्तनासाठी तयार आहेत. या संधीचा फायदा घेऊन भाजप जनतेच्या मनातील प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवा. संपूर्ण पक्ष तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही कुणालाही घाबरू नका, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी माजी सभापती दीपक पांचाळ यांनी ‘कोणाची हुकूमशाही नसलेला हा पक्ष आहे. त्यामुळे काम करणाऱ्याला पक्षात सन्मान मिळेल असा विश्वास वाटतो’, असे सांगितले. यावेळी सीमा नानिवडेकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आखवणे, भोम, नापणे, मांगवली गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रमोद जठार, संदेश पारकर यांनी त्यांचे स्वागत केले.
आमचे नेते कार्यकर्त्यांचा सन्मान करतात
भाजपमध्ये कार्यकर्ता हा परमेश्वरासमान आहे. आमचा पक्ष कुठल्याही आडनावावर चालत नाही. इथे 'यूज अँड थ्रो' पॉलिसीला थारा नाही. आमच्याकडे कार्यकर्त्यांची बोटे तोडली जात नाहीत. आॅईल टाकून पेटवले जात नाही. गाड्या जाळल्या, फोडल्या जात नाहीत. महिलांना कोंडून ठेवले जात नाही. तर आमचे नेते आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतात, अशा शब्दांत नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी विरोधकांवर बोचरी टीका केली.
आमचे नेते कार्यकर्त्यांचा सन्मान करतात
भाजपमध्ये कार्यकर्ता हा परमेश्वरासमान आहे. आमचा पक्ष कुठल्याही आडनावावर चालत नाही. इथे 'यूज अँड थ्रो' पॉलिसीला थारा नाही. आमच्याकडे कार्यकर्त्यांची बोटे तोडली जात नाहीत. आॅईल टाकून पेटवले जात नाही. गाड्या जाळल्या, फोडल्या जात नाहीत. महिलांना कोंडून ठेवले जात नाही. तर आमचे नेते आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतात, अशा शब्दांत नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी विरोधकांवर बोचरी टीका केली.