काँग्रेस, ‘स्वाभिमानी’कडून तरुण चेहरे

By admin | Published: November 5, 2016 11:48 PM2016-11-05T23:48:49+5:302016-11-06T00:33:59+5:30

कसबे डिग्रज जिल्हा परिषद निवडणूक : लाल दिव्याचे आकर्षण, दोन्ही पक्षात युतीची शक्यता

Young faces from Congress, 'Swabhimani' | काँग्रेस, ‘स्वाभिमानी’कडून तरुण चेहरे

काँग्रेस, ‘स्वाभिमानी’कडून तरुण चेहरे

Next

सोमनाथ डवरी -- कसबेडिग्रज --संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरणाऱ्या इस्लामपूर आणि सांगली विधानसभा मतदारसंघात विभागलेल्या कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदारसंघात यावर्षी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यात काहीही घडो, मात्र कसबे डिग्रज जिल्हा परिषद गटात कॉँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत युती होण्याचे संकेत आहेत. कारण दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकच आहेत! त्यामुळे कसबे डिग्रजचे युवा सरपंच विशाल चौगुले, वसंतदादा घराण्यातील विष्णू अण्णा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील (पद्माळे) आणि कसबे डिग्रजचे युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे ही तरुण नावे चर्चेत आहेत.
विशाल चौगुले माजी जि. प. सदस्य व वसंतदादा कारखान्याचे संचालकपद ‘स्वाभिमानी’तून मिळालेले ज्येष्ठ नेते श्रीपाल चौगुले यांचे पुत्र आहेत. ग्रामपंचायतीकरिता ते बिनविरोध निवडून आले आहेत, पण सरपंच पदासाठी त्यांना निवडणुकीस सामोरे जावे लागले. त्यात त्यांनी बाजी मारली. खा. राजू शेट्टी, माजी मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील यांच्याशी त्यांचा स्नेह आहे. सरपंच पदाच्या कारकीर्दीत विकास कामांचा, सामाजिक संपर्काचा जोर त्यांनी लावला आहे. विशाल चौगुले यांचे युवासंघटन मोठे आहे. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी आणि व्यावसायिक नसलेल्या शेतकरी कुटुंबातील बाळासाहेब शिंदे यांनी स्वत:च्या हिमतीवर मुंबईबरोबरच कसबे डिग्रज परिसरात व्यवसाय नेटाने उभारला आहे. गेल्यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना अपयश आले. परंतु समाजकार्यात ते अग्रेसर राहिले आहेत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि विशाल पाटील यांची भेट घेऊन, त्यांचा सहकारी मित्र परिवार, कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषदेकरिता तयारी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे नाव दमदार म्हणून पुढे येत आहे.
संग्राम पाटील यांनी तरुण सरपंच म्हणून पद्माळे येथे काम केले आहे. वसंतदादा घराण्यातील नवे नेतृत्व म्हणून ते मिरज पश्चिम भागात चर्चेत आहेत. त्याप्रमाणे सध्या विष्णुअण्णा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कसबे डिग्रज जिल्हा परिषद गटातून उभे करण्यासाठी जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, प्रतीक पाटील यांच्याकडे जोर लावला आहे.
या जिल्हा परिषद गटात कसबे डिग्रज व मौजे डिग्रज ही इस्लामपूर मतदार संघातील, तर नांद्रे व पद्माळे ही सांगली मतदार संघातील गावे आहेत. त्यामुळे या गटात पारंपरिक जयंत पाटील व दादा घराणे अशी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना काहीही झाले तरी आ. जयंत पाटील यांना जोरदार विरोध करण्यासाठी कॉँग्रेससोबत आघाडी करण्याच्या तयारीत आहे. कारण अद्यापही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित काम करीत आहेत. राष्ट्रवादी गटा-गटात विभागली आहे. सर्वांना एकत्र आणून तगडा सर्व पसंतीचा उमेदवार देणे, हे आ. जयंत पाटील यांच्यासमोर आव्हान आहे. इतर पक्ष आघाडीसोबत राहतील, अशी चर्चा आहे.


आम्ही पारंपरिक कॉँग्रेस व दादा घराण्याचे नेतृत्व मानणारे आहोत. खा. राजू शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून विकासकामे करीत आहोत. उमेदवारीबाबत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा निर्णय अंतिम राहील.
- विशाल चौगुले,
सरपंच, कसबे डिग्रज

सामाजिक काम करून जनतेची सेवा करीत आहे. मित्रपरिवार व कार्यकर्त्यांनी कॉँग्रेस व स्वाभिमानीच्या नेत्यांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र पक्षाने आदेश दिला तरच निवडणूक लढविणार आहे किंवा पक्ष देईल त्या उमेदवारांच्या विजयास जोरदार प्रयत्न करणार आहे.
- बाळासाहेब शिंदे,
उद्योजक, कसबे डिग्रज


वसंतदादा घराण्यातील युवा कार्यकर्ता म्हणून कॉँग्रेसचा उमेदवार निवडून आणणे हे माझे कर्तव्य आहे. उमेदवारीबाबत पक्ष आणि जयश्रीताई पाटील, विशालदादा, प्रतीकदादा यांचा निर्णय अंतिम असेल.
- संग्राम पाटील, पद्माळे,
अध्यक्ष, विष्णुअण्णा खरेदी-विक्री संघ.

Web Title: Young faces from Congress, 'Swabhimani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.