कोल्हापुरात थंडीने गारठून तरुणाचा मृत्यू : रुईकर कॉलनीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 11:02 AM2020-12-22T11:02:02+5:302020-12-22T11:04:58+5:30
Winter Session Maharashtra Death Kolhapur- कडाक्याच्या थंडीत गारठून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना येथील रुईकर कॉलनीत घडली. समीर निजाम लांजेकर (वय ३०, रा. वडणगे, ता. करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
कोल्हापूर : कडाक्याच्या थंडीत गारठून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना येथील रुईकर कॉलनीत घडली. समीर निजाम लांजेकर (वय ३०, रा. वडणगे, ता. करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समीर लांजेकर हे दारूच्या व्यसनी असल्याने गेल्या पाच वर्षांपासून घराबाहेरच होते. शहरात सर्वत्र फिरून गार्डन, रस्त्याकडेच्या फूटपाथवर ते आसरा घेत होते. गेल्या दोन दिवसांत कोल्हापुरात कडाक्याची थंडी वाढली आहे.
रविवारी रात्री रुईकर कॉलनीतील महालक्ष्मी गार्डनच्या बाकड्यावर समीर हे झोपले होते. रात्रीच्यावेळी कडाक्याची थंडी पडल्याने ते झोपलेल्या स्थितीत मृत झाले होते. सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह बाकड्यावर बेवारस स्थितीत आढळला.
मृतदेहावर सीपीआर रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. अतिदारू सेवन व थंडीने गारठून त्याचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आल्याचे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी सांगितले.
दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर माने, गणपती बिरंगुळे, सुनील मोरे यांनी सायंकाळपर्यंत त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला. मृत समीर लांजेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
(तानाजी)