दानोळीत मगरीच्या हल्ल्यात तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:25 AM2021-09-03T04:25:02+5:302021-09-03T04:25:02+5:30
दानोळी : येथील वारणा नदीत पोहायला गेलेल्या तरुणावर मगरीने हल्ला करून त्याला जखमी केले. कय्युम नदाफ असे जखमी तरुणाचे ...
दानोळी : येथील वारणा नदीत पोहायला गेलेल्या तरुणावर मगरीने हल्ला करून त्याला जखमी केले. कय्युम नदाफ असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कय्युम आपल्या मित्रांसोबत गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास वारणा नदीत पोहायला गेला होता. तो पाण्यात उतरल्यानंतर काही वेळातच मगरीने त्याचा पाय पकडून नदीपात्रात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मगरीने पाय धरले असल्याचे ओरडून मित्रांना सांगितले. यावर मित्रांनीही आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. कय्युमने मोठ्या प्रयत्नाने आपला पाय मगरीच्या तावडीतून सोडवून घेतला व तो काठावर आला. यावेळी केवळ दैव बलवत्तर म्हणून मागरींच्या तावडीतून कय्युमचा जीव वाचला आहे.
या हल्ल्यात पायावर अनेक ठिकाणी चावा घेतल्याने मगरीचे दात घुसल्याने जखमा झाल्या आहेत. त्याला सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली आहे. वारणा नदीपात्रात मागरींचा वावर असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार केली आहे. महापुरामुळे मागरींची संख्या वाढली असून विहिरी तसेच शेतामध्ये मगरी दिसून आल्या आहेत. कय्युमवर मगरीने केलेल्या हल्ल्यामुळे वारणा नदीकाठावर भीतीचे वातावरण पसरले आहे.