रागाने बघितल्याच्या कारणावरून ट्रॅक्टरखाली ढकलून तरुणाचा खून, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 22:44 IST2025-01-18T22:43:55+5:302025-01-18T22:44:37+5:30
न्यायवैधक तपासणीसाठी तिरडी बांधून ठेवलेल्या मृतदेहाचा उलटा प्रवास

आरोपी
इचलकरंजी : रागाने बघितल्याच्या कारणावरून ट्रॅक्टरखाली ढकलून एका तरुणाचा खून करण्यात आला. विशाल आप्पासो लोकरे (वय 29 रा. संतमळा) असे त्याचे नांव आहे. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी न्यायवैधक तपासणी (फॉरेन्सीक लॅब) च्या तांत्रिक बाबीसाठी तिरडी बांधून ठेवलेला मृतदेह पुन्हा विच्छेदनासाठी उलटा प्रवास करत व्हाया आयजीएम, सांगली सिव्हील रुग्णालयात नेला. यामुळे नातेवाईकांना अंत्यविधीसाठी ताटकळत थांबावे लागले.
सागर मोहन वाघमारे (वय 29), यश अरुण चौगुले (वय 26), संतोष बळवंत मनोळे (वय 21, तिघे रा. संत मळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील संत मळ्यात राहणारा विशाल लोकरे आणि त्याचा मित्र अनिकेत सुनिल तोडकर (वय 20) हे दोघे शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास विकली मार्केट परिसरातील एका वाईन शॉपमध्ये गेले होते. तिथे आलेला सागर हा रागाने बघितल्याच्या कारणावरुन विशालसोबत वाद घालू लागला.
आकाश जगदाळेे, अरुण चव्हाण आणि महेश सुतार यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. तर सागर आणि त्याच्यासोबतचे यश व संतोष या तिघांनी विशालला धक्काबुक्की करत ठार मारण्याच्या उद्देशाने ऊस वाहतुक करणार्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली ढकलून दिले. या घटनेत विशालच्या डोक्याला, पोटाला, मांडीला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सांगली सिव्हील रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला. विशाल याचा भाऊ निलेश लोकरे याच्या तक्रारीनुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान सांगलीतील रुग्णालयात विच्छेदन करुन नातेवाईकांनी मृतदेह शनिवारी सकाळी घरी आणला. परंतु न्यायवैधक तपासणी पथकाने घटनास्थळी केलेल्या पाहणीत काही तांत्रिक बाबी उपस्थित केल्या. त्यामुळे सर्व सोपस्कार करुन मृतदेह अंत्यविधीसाठी नेताना विशालच्या आणखी काही तांत्रिक नमुण्यासाठी पोलिसांनी शववाहिका अडवून तिरडीवर बांधलेला मृतदेह पुन्हा आयजीएम रुग्णालयात आणला. तेथे रुग्णालय प्रशासनाने ज्याठिकाणी शवविच्छेदन केले जाते त्याचठिकाणी ते नमुणे घेतले जातात, असे सांगितले. त्यामुळे मृतदेह पुन्हा सांगली सिव्हील रुग्णालयाकडे नेऊन नमुणे घेऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गावभाग पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेचे पथक कार्यरत झाले होते. त्यातील यश या संशयीतास गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतले. तर सागर आणि संतोष या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेशनच्या पथकाने सावंतवाडीतून ताब्यात घेतले.