फटाके वाजवल्याच्या रागातून युवकाचा धारदार शस्त्राने खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:32 AM2019-10-18T11:32:18+5:302019-10-18T11:42:16+5:30
डॉल्बी मोठ्याने लावल्याच्या व फटाके वाजवल्याच्या रागातून गल्लीतील युवकाचा धारदार शस्त्राने खून केला. राहुल तुलसीदास शिवूडकर (वय वर्षे २५) असे त्याचे नाव आहे.गल्लीतील युवकानेच खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यड्राव : डॉल्बी मोठ्याने लावल्याच्या व फटाके वाजवल्याच्या रागातून गल्लीतील युवकाचा धारदार शस्त्राने खून केला. राहुल तुलसीदास शिवूडकर (वय वर्षे २५) असे त्याचे नाव आहे.गल्लीतील युवकानेच खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यड्राव ( ता शिरोळ) येथील रेणुकानगर गल्ली नं १ मध्ये प्रत्येक संकष्टीला सामुदायिक आरती व महाप्रसादाचे आयोजन असते. त्याच प्रमाणे गुरुवारी संकष्टी असल्याने गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर फटाके लावून डॉल्बी लावण्यात आली आणि महाप्रसाद वाटप सुरू असताना अविनाश नर्लेकर याने राहुलबरोबर वाद घातला.
वादावादीत अविनाश याने राहुल याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ला होताच वार चुकविण्याचा राहुलने प्रयत्न केला, त्यावेळी तो पडला, ही संधी साधून पुन्हा त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने भोसकण्यात आले. यावेळी आरडाओरड झाल्याने कार्यक्रम ठिकाणी गोंधळ उडाला. जखमी राहुल यास उपचारासाठी इचलकरंजी येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले, परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्यास कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. परंतु रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
गल्ली मध्ये ही वार्ता समजल्यावर शोककळा पसरली . राहुल शिवूडकर हा दिवाणजी कामासही मेंडिंगचे काम करत होता. त्याचा अविनाश नर्लेकर याच्याबरोबर नवरात्रीपासून किरकोळ कारणावरून वाद होता. पुन्हा संकष्टीच्या निमित्ताने डॉल्बी लावण्याचा वादातून ही घटना घडली.
इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल इस्पितळात शवविच्छेदन करण्यात आले. सकाळी मृतदेह घरी आल्यावर नातेवाईकांनी आक्रोश केला. गल्ली मध्ये शोककळा पसरली होती.
यड्राव परिसरात दसऱ्यानंतर खूनाची ही दुसरी घटना घडली आहे.शहापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक के. एन. पाटील करीत आहेत