अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचारप्रकरणी तरुणास १० वर्षे सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 03:41 PM2022-01-24T15:41:35+5:302022-01-24T15:41:51+5:30
जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : ५० हजारांचा दंडही ठोठावला
कोल्हापूर : नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास १० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ओंकार उर्फ बंड्या उर्फ भूकंप आनंदा दाभाडे (वय २३ रा. कोल्हापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र.१) एस. आर. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मंजूषा बी. पाटील यांनी काम पाहिले.
खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, पीडित मुलगी ही चौथीमध्ये शिकत होती. तिच्या घरी आरोपी ओंकार दाभाडे याचे येणे-जाणे होते. पीडित मुलगी ही आजीकडे राहत होती. दि. १५ सप्टेंबर २०१८ ला आजी कामावर गेल्या. मुलगी घरी एकटीच होती. दुपारी १२ वाजता आजी घरी परतल्यानंतर आरोपी ओंकार दाभाडे याने मुलीवर लैगिक अत्याचार केल्याचे आढळले. खटल्यात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासले. साक्षी, पुराव्यासह सरकारी वकील मंजूषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य माणून न्यायमूर्तींनी आरोपीस दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील ४० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा आदेश केले.
पेरू घेण्यासाठी ५ रुपये देऊन ‘बंड्या दादा’चे घृणास्पद कृत्य
पीडित मुलगी ही आरोपीला बंड्या दादा म्हणून हाक मारायची. तिच्या अज्ञातपणाचा गैरफायदा उठवत त्याने तिला पेरूसाठी पाच रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिक अत्याचार केले. बंड्या दादाने कशी वागणूक दिली, ते घृणास्पद कृत्यही तीने आजीला सांगितले.