जिगरबाज तरुणांनी जपली माणुसकी; पुराच्या पाण्यातून खांद्यावरून नेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 06:40 PM2019-08-11T18:40:29+5:302019-08-11T18:44:33+5:30
पुराच्या पाण्यात सापडले होते अनोळखी प्रेत
अनिल पाटील
मुरगूड - यमगे ता. कागल येथे निपाणी राधानगर रस्त्यावर आलेल्या पुराच्या पाण्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला.उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड च्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी ऐनवेळी कोणतेही वाहन उपलब्ध होत नाही हे पाहून गावातील काही जिगरबाज तरुणांनी लोखंडी तडकी वरून यमगे पासून मुरगूड पर्यंत सुमारे दोन किलोमीटर अंतर सुमारे पाच फूट पाण्यातून खांद्यावरून हा मृतदेह नेला. अनोळखी प्रेताप्रती या तरुणांनी माणुसकीच नातं जपत पोलीस प्रशासनाला केलेली मदत नक्कीच कौतुकास्पद आहे.
याबाबत अधिक माहिती अशी वेदगंगेला आलेल्या महापुराचे गेल्या आठ दिवसापासून निपाणी राधानगर हा रस्ता पूर्ण पणे बंदच आहे. या रस्त्यावर यमगेपासून निढोरीपर्यंत सुमारे तीन किलोमीटर रस्त्यावर सरासरी सात फूट पाणी होते. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पाणी झपाट्याने उतरत आहे. आज यमगे शिंदेवाडी दरम्यान यमगेकडील बाजूस शिवच्या पुलाजवळ पुराच्या पाण्यात एक मृतदेह तरंगत असलेला काही युवकांना दिसला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरल्यानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली.
पोलिसांना ही माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोहचले.तो मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.त्याची उत्तरीय तपासणी करण्यासाठी तो मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक होते.यासाठी गावात एखादे वाहन सापडते का याचा शोध पोलीस कर्मचारी घेत होते.सुमारे शंभर हुन अधिक ट्रॅक्टर,ट्रक आदी वाहने असताना ही अनेकांनी मृतदेह नेण्यास नकार दिला.याबाबत गावचे सरपंच आणि पंचायत समिती सदस्य विजय भोसले याना फोन वरून पोलिसांनी ही माहिती दिली.तरी ही बराच वेळ कोणत्याच वाहनांची सोय झाली नाही.
शेवटी घटनास्थळावर असणारे पोलीस पाटील किरण भाट, प्रमोद पाटील सरनोबत,अनिल मारुती पाटील, सुशील पाटील, वैभव पोवार, आकाश चावरे, सूरज कोंडेकर, महेश परीट आणि युवराज पाटील या तरुणांनी गावातील लोखंडी तडकी आणली. प्रेत गोणपाटामध्ये बांधून त्या तडकीवरून खांद्यावरून पुराच्या पाण्यातून मुरगुडकडे नेण्यास सुरवात केली. सुरवातीला पाणी कमी होते पण शिंदेवाडी जवळील ओढ्यावर सुमारे छाती एवढ्या पाण्यातून सदरचा मृतदेह सुमारे दोन किलोमीटर चालत मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी या तरुणांच्या बरोबर सहाय्यक फोजदार मधकुर पाटील, स्वप्नील मोरे हे पोलीस कर्मचारी होते.पाण्यामुळे सडल्याने मृतदेहाला दुर्गंधी सुटली होती.पण कशाची ही तमा न बाळगता या तरुणांनी अत्यन्त धाडसाने या अनोळखी मृतदेहाला खांदा देत जपलेले माणुसकीच नात अनेकांच्या डोळ्यात अंजन घालून गेलं.एकीकडे मृतदेह न्यावा लागेल म्हणून घटनास्थळावरून पळून गेलेले ट्रॅक्टर आणि टेम्पो चालक तर गावातील अनेक वाहन चालकांनी दिलेला नकार यामुळे वैतागलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्याच गावातील या तरुणांची माणुसकी बघून आश्चर्य वाटले.