‘एकत्र जगू नाही, पण मरु शकतो’, अहमदनगरमधील प्रेमीयुगुलाची कोल्हापुरात गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 06:08 PM2022-01-03T18:08:37+5:302022-01-04T10:59:10+5:30
तरुणीचा तीन वर्षापूर्वी गावातच एकाशी विवाह झाला आहे. मात्र आत्महत्या केलेल्या तरुणाशी गेले काही वर्षे प्रेमसंबध होते.
कोल्हापूर : अहमदनगर जिल्ह्यातील तामसवाडी (ता. नेवासा) येथील एका प्रेमीयुगुलाने कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील एका यात्री निवासमध्ये (धर्मशाळा) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
राहुल विश्वासराव मच्छे (वय २५), प्रियंका विकास भराडे (वय २२) अशी आत्महत्या केलेल्या दोघांंची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. रुममध्ये टेबलवर पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीत ‘आम्ही दोघे एकत्र जगू शकत नाही, पण मरु शकतो’, असे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल मच्छे व प्रियंका भराडे हे एकाच गावचे रहिवासी आहेत. प्रियंकाचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. गेली काही वर्ष दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. ते दोघे ३१ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी एसटी बसने कोल्हापुरात आले. दोघे श्री अंबाबाई मंदिर परिसरातील ताराबाई रोडवरील एका यात्री निवासमध्ये दाम्पत्य या नात्याने रूम नंबर ६ मध्ये उतरले.
शुक्रवारी सायंकाळी त्यांनी रूमचा दरवाजा बंद केला. तो उघडला नसल्याने शनिवारी रात्री ११ वाजता यात्री निवास मालकांना शंका आली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक संदीप जाधव व उपनिरीक्षक प्रीतम पुजारी यांनी संबंधित यात्री निवासला भेट दिली. रूमचा दरवाजा तोडला असता, या प्रेमीयुगुलाने छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांना रुममध्ये एकच बॅग मिळाली. त्यात कपडे, राहुलचे आधारकार्ड सापडले. प्रियंकाने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत गावातील एकाचा संपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावरून पोलिसांनी फोनवरुन दोघांच्याही नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. यात्री निवास मालक रवी सलुजा (रा. जोतिबा रोड) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
‘माफ करा, दोघांचाही अंत्यविधी एकत्रित करा’
आत्महत्या करण्यापूर्वी प्रियंकाने लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये ‘तात्या, मामी, आत्या, मम्मी आणि माझे सगळे भाऊ तसेच राहुलचे दादा, मम्मी, गौतम, दाजी व बहीण यांनी आम्हाला माफ करावे. आम्ही प्रेम करतो; पण प्रेम कोणाला कळले नाही. आम्ही दोघे एकत्र जगू शकत नसलो तरी मरू मात्र शकतो. त्यामुळे २०२२ हे वर्ष आम्हाला पाहायचे नाही. आम्हाला माफ करा, दोघांचाही अंत्यविधी एकत्रित करा’, असा मजकूर आहे.
जीवन संपविण्यापूर्वी मारली मिठी
दोघांनीही एकाच हुकाला वेगवेगळ्या साड्यांनी गळफास लावून घेतला, दोघांनीही जीवन संपविण्यापूर्वी एकमेकांना मिठी मारल्याचे आत्महत्येनंतर खोलीतील दृश्यावरून दिसत होते.