कोल्हापूरकर रंगले रंगात, सप्तरंगांची केली मुक्त उधळण
By संदीप आडनाईक | Published: March 30, 2024 07:01 PM2024-03-30T19:01:38+5:302024-03-30T19:02:02+5:30
कोल्हापूर : सप्तरंगांची मुक्त उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग, रंगाने भरलेले फुगे आणि भरलेली पिचकारी घेऊन ...
कोल्हापूर : सप्तरंगांची मुक्त उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग, रंगाने भरलेले फुगे आणि भरलेली पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली बच्चेकंपनी, कुटुंबातील मुले, नातवंडांसोबत रंगून गेलेले आबालवृद्ध, मैत्रीच्या नात्याला रंगांनी अधिक गहिरे करणाऱ्या या उत्सवात युवक-युवतींसह सारे कोल्हापूर शनिवारी अवघे रंगात रंगले. शहरातील रस्त्यांनाही यानिमित्ताने रंग चढला होता.
होळीनंतर येणाऱ्या या रंगपंचमीच्या दिवसाची लहान मुले आतुरतेने वाट पाहत होती. भेदभाव विसरायला लावणाऱ्या आणि मनामनातील कटुता रंगांनी पुसून टाकणाऱ्या या दिवसाला भल्या सकाळी बच्चेकंपनीच्याच किलबिलाटाने जाग आली. उठल्या-उठल्या हातात वेगवेगळे रंग, रंगाने भरलेले फुगे घेऊन लहान मुलांनी एकमेकांना रंगवायला सुरुवात केली. दारात ठेवलेल्या बादलीतून पिचकारी भरुन येईल त्याला चिंब भिजवताना त्यांचा होणारा जल्लोष आणि गमती-जमती मोठ्यांनाही आनंद देणाऱ्या होत्या. त्यांच्यासोबत रंग खेळताना आईवडिल, बहिण भावांसोबत मोठेही लहान झाले होते.
शालेय आणि महाविद्यालयीन मुलामुलींनीही रंग खेळण्यास सकाळपासूनच सुरुवात केली. घरातली मोठी माणसं, नातेवाईक, मित्रपरिवार, गल्लीतल्या मित्र-मैत्रिणींना रंगवून झाल्यानंतर रंगलेल्या चेहऱ्यांनीच शहरात अन्यत्र राहत असलेल्या मित्र-मैत्रिणींना रंगवण्यासाठी युवक-युवती ग्रुपने दुचाकीवरून फिरत होते. वाटेत कोणी मित्र भेटले की त्यांना रंगवून पुढे जायचे. एरव्ही आपल्या लुकबद्दल अधिक जागरुक असलेले मुले-मुली वेगवेगळे रंग आणि पिवडीने नखशिखांत रंगून ओळखू न येणाऱ्या चेहऱ्यानिशी दुचाकीवरुन सुसाट जाताना दिसत होते. या रंगांच्या खेळात मुलांसोबत महिलांही मागे नव्हत्या.
कुटुंबीयांच्या सरबराईत गुंतलेल्या महिलाही कामे आटोपून रंग खेळायला बाहेर पडल्या. आपल्या परिसरातील अपार्टमेंट, सोसायट्या, कॉलन्या, पेठांमधील मैत्रिणींना रंगवण्यासाठी झुंडीने जात होत्या. एखाद्या महिलेने आढेवेढे घेतलेच तर त्यांना बाहेर काढून क्षणार्धात रंगवून आपल्यातलेच एक बनवायचे.
लाईव्ह डीजे, खास साऊंड सिस्टीमवर रंगपंचमी
महिलांमधील जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे नाते अधिक घट्ट झाले. खास महिलांनाही मुक्तपण रंग खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी रंकाळा, अंबाई टँक, गजानन महाराज नगर आदी भागांमध्ये लाईव्ह डीजे, खास साऊंड सिस्टीम आणि पाण्याचे शॉवर लावलेले होते. याशिवाय विविध तरुण मंडळे, तालीम मंडळांनीही रंगपंचमीचे आयोजन केले होते.