तरुणी महिलांचा उदंड प्रतिसाद, मतदानाचे समाधान अधिक द्विगुणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:45 PM2019-10-22T13:45:56+5:302019-10-22T13:51:02+5:30
मतदानासाठी नवमतदार व तरुणींचा उत्साह ओसंडून वाहत होता. हातात मतदानाची स्लीप घेऊन रांगांमध्ये थांबलेल्या या तरुणींकडून पहिल्यांदा करत असलेल्या मतदानाबद्दल औत्सुक्य होते. आई, बहीण, भावजय, वडील ते अगदी मैत्रिणींसोबत येऊन युवतींनी मतदानाचा हक्क बजावला.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावत तरुणी व महिलांनी उत्स्फूर्तपणे हा लोकशाहीचा उत्सव साजरा केला. पुरूषांच्या बरोबरीने किंबहुना काही मतदान केंद्रांवर महिलांच्याच लांबलचक रांगा दिसत होत्या. चारनंतर येणाऱ्या संभाव्य पावसामुळे सकाळच्या टप्प्यातच मतदान करण्यास महिलांनी प्राधान्य दिले. विवेकानंद महाविद्यालय, अंबाई टँक येथील रोटरी विद्यालय यांसह शहरात ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या सखी मतदान केंद्रांमुळे मतदानाचे समाधान अधिक द्विगुणित झाले.
शासकीय यंत्रणा, अधिकारी, सेलिब्रेटी अशा विविध घटकांकडून केल्या गेलेल्या जनजागृतीमुळे महिला व तरुणीच नव्हे, तर सर्वच स्तरांतल्या नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे मतदान केले जात असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. अंबाई टँक येथील रोटरी विद्यालयात, तसेच विवेकानंद महाविद्यालयात सखी व आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते. त्यानिमित्त मतदान केंद्राच्या हॉलसह बाह्य परिसरात सुरेख सजावट करण्यात आली होती. वडणगे येथील मतदान केंद्रावर महिलांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत होते. मतदान केल्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येत होते.
कोल्हापूर शहरासह उपनगर व लहान-मोठ्या गावांना जोडलेल्या उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी दिसत होती. कौटुंबिक कामांमुळे भल्या सकाळी महिलांना मतदानासाठी बाहेर पडता आले नसले, तरी नऊ वाजल्यानंतर महिला व युवतींची पावले मतदान केंद्राकडे वळत होती. महिलांच्या सोईसाठी महिलांच्या व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या. सकाळी दहानंतर पाचगावमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची रांग मोठी होती. याशिवाय शहरातील मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, ताराबाई रोड, जुना बुधवार पेठ या पेठापेठांमध्ये तर महिलांकडून जणू मतदानाची चुरसच होती.
मतदानासाठी नवमतदार व तरुणींचा उत्साह ओसंडून वाहत होता. हातात मतदानाची स्लीप घेऊन रांगांमध्ये थांबलेल्या या तरुणींकडून पहिल्यांदा करत असलेल्या मतदानाबद्दल औत्सुक्य होते. आई, बहीण, भावजय, वडील ते अगदी मैत्रिणींसोबत येऊन युवतींनी मतदानाचा हक्क बजावला. गेले दोन दिवस दुपारचे चार वाजले की जोरदार पाऊस होत आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने उघडीप दिली असली, तरी दुपारनंतर काही सांगता येत नाही, यामुळे महिलांनी दुपारच्या आतच मतदान करण्यावर भर दिला. एरवी दुपारी मतदान केंद्रे रिकामी असल्याचे चित्र असते. यावेळी मात्र पावसाच्या धास्तीने आलेल्या मतदारांमुळे मतदान केंद्रांवर भर दुपारीदेखील मोठी गर्दी होती.