डॉल्बी लावण्यावरून तरुणास भोसकले
By admin | Published: January 31, 2016 01:40 AM2016-01-31T01:40:57+5:302016-01-31T01:41:17+5:30
चौघांवर गुन्हा : राजेंद्रनगरात वरातीवेळी घटना
कोल्हापूर : राजेंद्रनगर येथे ‘वडील आजारी आहेत, डॉल्बी हळू आवाजात लावा,’ असे सांगणाऱ्या तरुणाला चौघाजणांनी चाकूने भोसकले. तानाजी अंकुश कांबळे (वय २०) असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २९) रात्री घडली. या हल्ल्यामुळे राजेंद्रनगर परिसरात तणाव आहे. जखमी कांबळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी संशयित
आरोपी सुखदेव बुध्याळकर, शिवराम बुध्याळकर, नागेश शिंपी, दशरथ सावंत (सर्व, रा. राजेंद्रनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, तानाजी कांबळे याचे वडील आजारी आहेत. शुक्रवारी (दि. २९) रात्री या परिसरात लग्नाची वरात निघाली होती. यावेळी तरुण डॉल्बी लावून धिंगाणा घालत होते. डॉल्बीच्या आवाजाने त्याच्या वडिलांना त्रास होऊ लागला. त्यामुळे तो वरातीमध्ये धिंगाणा घालणाऱ्या सुखदेव बुध्याळकर, शिवराम बुध्याळकर, नागेश शिंपी, दशरथ सावंत यांना डॉल्बी हळू आवाजात लावा, असे सांगू लागला. त्यावर या तरुणांनी चाकू काढून त्याला भोसकले.
वरातीमध्ये हल्ला झाल्याने गोंधळ उडाला. या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस
आल्याचे पाहून तरुणांनी तेथून पळ काढला; तर वरात अर्ध्यावरच बंद केली. जखमी तानाजी याला नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याने वरील चौघांविरोधात फिर्याद दिली. अधिक तपास राजारामपुरी पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)