झेंडू लागवडीतून हमखास नफा
By admin | Published: November 17, 2015 12:10 AM2015-11-17T00:10:09+5:302015-11-17T00:26:43+5:30
पिकाच्या अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी १५० कि. ग्रॅ. नत्र, ६० कि.गॅॅ्र. स्फुरद व ६० कि.ग्रॅ. पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या अगोदर द्यावे.
मच्छिंद्र मगदूम-- सांगरुळ झेंडूचे दर्जेदार उत्पादन मिळवायचे असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाने लागवड करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये सुधारित जातींचा वापर, उत्तम प्रतीच्या बियाण्यांची निवड, रोपवाटिका व्यवस्थापन, हेक्टरी झाडांची संख्या व आंतरमशागत याकडे लक्ष द्यावे, असे जाणकारांचे मत आहे. झेंडूची लागवड करीत असताना योग्य, पाण्याचा निचरा होईल अशी जमीन निवडावी. जमीन नांगरून छोटे छोटे वाफे तयार करून झेंडूची लागवड करता येते. तसेच खरीप हंगामात सरी वरंब्यावर (बोदावर) लागवड करावी. उन्हाळ्यात व रब्बी हंगामात उंच, सफाट वाफ्यावर लागवड करावी. लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी रोपांना मातीची भर द्यावी. पुनर्लागवड शक्यतो दुपारी करावी. रोपांची लागवड करताना समान अंतर ठेवून बोदाच्या माथ्यावर रोप लावावे. यामुळे रोपे कोलमडून खाली पडणार नाहीत. तसेच पुनर्लागवड केल्यास हलकेसे पाणी लगेच द्यावे. एक एकर क्षेत्रासाठी साधारण २०० ते ३०० ग्रॅम बियाणे लागते, तर रब्बी हंगामासाठी १५० ते २०० ग्रॅम बियाणे लागते. बियाण्यास बीजप्रक्रिया केलेली नसल्यास दोन ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन प्रतिकिलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
झाडांच्या भरघोस वाढीसाठी व अधिक उत्पन्नासाठी जातीनुसार अंतर ठेवावे. दोन ओळींमध्ये ४५ सें.मी. किंवा ३० किंवा २० सें.मी. अंतर ठेवावे व दोन रोपांमध्ये ३० ते १० सें.मी. अंतर ठेवावे. दरम्यान, झेंडूचे झाड अतिशय जोमाने वाढत असल्यास झेंडूच्या झाडाला नत्र, स्फुरद व पालाश खताची गरज असते. या पिकाच्या अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी १५० कि. ग्रॅ. नत्र, ६० कि.गॅॅ्र. स्फुरद व ६० कि.ग्रॅ. पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या अगोदर द्यावे. नंतर नत्राचे चार हफ्ते करावेत व दर्जेदार फुलांसाठी एक टक्का युरियाची फवारणी घ्यावी, तर तीन ते चार वेळा चांगली खुरपणी करावी. झेंडूसाठी पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे असून पाण्याची पाळी जमिनीच्या प्रकारानुसार व हंगामानुसार द्यावी. तसेच पाण्याचा ताण बसणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशा पद्धतीने पिकाची काळजी घेतल्यास झेंडू लागवडीतून चांगले उत्पादन येऊन त्यातून शेतकऱ्याला चांगला नफा मिळू शकतो.
झेंडूच्या सुधारित जाती
झेंडूच्या पिकात फूलधारणा ही प्रकाशाचा कालावधी व उपलब्ध तापमान यावर अवलंबून असते. यामुळे लागवडीसाठी जातीची निवड करताना विविध गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. हंगामानुसार पुढीलप्रमाणे सुधारित जातींची निवड करावी.
रब्बी हंगाम : पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा, टायगर इन्का हायब्रीड (आॅरेंज व यलो)
उन्हाळी हंगाम : कॅ्रकर जॅक व लोकल
४खरीप हंगाम : आफ्रिकन जायंट टॉल, यलो, कॅलकट्टीया जाफरी (यलो व आॅरेंज) लाडू गेंदा