तुमचा टाटा, तर आमचा बाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:47 PM2019-04-16T23:47:52+5:302019-04-16T23:47:58+5:30

मी व्यवसायाने एक फेरीवाला; त्यामुळे जगण्याची लढाई रस्त्यावरूनच सुरू झालेली. फेरीवाल्यांच्या हक्कांसाठी लढता-लढता कार्यकर्ता बनलो. निवडणुकीत कार्यकर्त्यांना भलताच मान ...

 Your Tata, Our Bat | तुमचा टाटा, तर आमचा बाटा

तुमचा टाटा, तर आमचा बाटा

Next

मी व्यवसायाने एक फेरीवाला; त्यामुळे जगण्याची लढाई रस्त्यावरूनच सुरू झालेली. फेरीवाल्यांच्या हक्कांसाठी लढता-लढता कार्यकर्ता बनलो. निवडणुकीत कार्यकर्त्यांना भलताच मान असतो तसा तो आमच्या उमेदीच्या काळातही मिळाला. थोरा-मोठ्यांची भाषणं ऐकणे आणि त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणणे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे कर्तव्य असायचे; त्यामुळे व्यक्तिमत्त्वसुद्धा तसेच घडत गेले. एकनिष्ठ, प्रामाणिक, स्वाभिमानी, तत्त्वाशी बांधील या गोष्टी कार्यकर्ता म्हणून आमच्यात भिनल्या, त्या अगदी तरुणवयात. आजही एखादी भूमिका निश्चित केली, की त्यात बदल नाही. मला मतदानाचा अधिकार नसलेल्या वयापासून मी प्रचारात सक्रिय असणारा कार्यकर्ता. निवडणुकीत चौकाचौकांत मंडप, बूथ घालून स्पीकर लाऊन प्रचार करण्यात पुढाकार असायचा. गल्ली-बोळांत प्रचारफेरी, सायकल फेरी काढायची. मोठी माणसं खिशातील पैसे घालून चहा पाजायचे. पाहुणचार काय तो एवढाच! यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, श्रीपाद डांगे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांची बिंदू चौकात भाषणे व्हायची. नावं ऐकून लोक सभा ऐकायला यायचे. आतासारख्या गाड्या पाठवायला लागत नव्हत्या. भाषणातून टीका व्हायची; पण ती वैचारिक पातळीवर होत असे. वैयक्तिक पातळीवर कोणी बोलत नसायचे. कोणाचे चारित्र्यहनन होईल, असे बोलत नसत. लोक भाषणे ऐकायचे आणि मनाला पटेल त्याप्रमाणे मतदान करायचे. राग, द्वेष कोणाच्या मनात राहायचा नाही. कोल्हापूर पुरोगामी, कष्टकरी समाजाचे शहर असल्याने येथे सुरुवातीला कॉँग्रेसचे चालत नव्हते. कॉँग्रेसविरुद्ध प्रचार करताना आम्ही कार्यकर्ते म्हणायचो ... ‘तुमच्या हातात टाटा, तर आमच्या हातात बाटा’! हा पंच एकदम लोकप्रिय. बाटा ही एक कंपनी, ती कंपनी चप्पल बनवायची; त्यामुळे म्हटले तर टीका एकदम खोलवर असायची; परंतु प्रतिस्पर्धीसुद्धा ती तितक्याच मोठ्या मनाने झेलायचे. प्रचारसभांतील भाषणं ऐकायला खूप बरं वाटायचं. लोकही प्रोत्साहन द्यायचे. बिंदू चौक पूर्ण भरलेला असायचा. आतासारख्या विविध भागांत सभा होत नव्हत्या. ज्या काही व्हायच्या त्या बिंदू चौकातच! अशा सभांतील वैचारिक भाषणांतून आमच्यासारखे कार्यकर्ते घडले. पैशांपुढे न झुकणारे, निष्ठेचा बाजार न करणारे. स्वाभिमान जपणारे.

महंमद शरीफ शेख,
अध्यक्ष, असंघटित कामगार संघटना

Web Title:  Your Tata, Our Bat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.