कोल्हापुरातील मालमत्तेवरून अपहरण करून तरुणाचा खून, आईची सुटका; पाच जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 12:14 PM2023-05-04T12:14:53+5:302023-05-04T12:15:34+5:30

मामाच्या मुलानेच रचला कट

Youth abducted from property in Kolhapur murdered, Five people were arrested | कोल्हापुरातील मालमत्तेवरून अपहरण करून तरुणाचा खून, आईची सुटका; पाच जणांना अटक 

कोल्हापुरातील मालमत्तेवरून अपहरण करून तरुणाचा खून, आईची सुटका; पाच जणांना अटक 

googlenewsNext

मुंबई/कोल्हापूर : मालमत्तेच्या लोभापोटी माय-लेकाचे अपहरण करून त्यातील मुलाचा खून करणाऱ्या पाच नराधमांना चेंबूर पोलिसांनी अटक केली. ५ एप्रिलपासून हे माय-लेक बेपत्ता होते. अखेरीस वृद्धेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले असले तरी, मुलाचा खून केल्याची कबुली पाच जणांनी दिली आहे. 

विशाल वसंत कांबळे (वय ४४, रा. आर. के. नगर, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. विशालचा पनवेल येथे खून करून त्याचा मृतदेह बडोदा-अहमदाबाद महामार्गाच्या कडेला फेकून देण्यात आला आहे. रोहिणी वसंत कांबळे (वय ८०, रा. आर. के. नगर, कोल्हापूर ) यांची चेंबूर पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ देसाई यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मृत विशाल हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी वसंत कांबळे यांचा मुलगा आहे.

मूळचे कोल्हापुरातील आर. के. नगर येथील रोहिणी कांबळे आणि विशाल कांबळे या दोघांचे ५ एप्रिल रोजी चेंबूर येथील हॉटेलमधून अपहरण करण्यात आले. कोल्हापुरातील मालमत्तेवरून कोर्ट कचेरी सुरू असल्याने दोघे मुंबईत आले होते. रोहिणी यांच्या बहिणीने दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार २१ एप्रिलला पोलिसांत नोंदवली. अखेरीस २ मे रोजी या बेपत्ता नाट्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.

निलंबित बेस्ट बसचालक मुनीर पठाण (४१, वडाळा), चालक रोहित अदमाने (४०, पवई), राजू दरवेश (४०, मीरा रोड), केअर टेकर ज्योती वाघमारे (३३, मानखुर्द) आणि प्रणव रामटेके (२५, रा. कोल्हापूर) या पाच जणांनी कांबळे माय-लेकाचे अपहरण केले. रोहिणी कांबळे यांना सुरुवातीला राजस्थानात एका ठिकाणी डांबून ठेवले. त्यानंतर गोरेगावातील रॉयल पाम ब्लॉक सेक्टरमध्ये ठेवले.

दुसरीकडे मुलगा विशाल याला मालमत्ता खरेदी- विक्रीच्या बैठकीसाठी पनवेलला नेऊन एका व्हिलामध्ये खून करून त्याचा मृतदेह बडोदा-अहमदाबाद महामार्गाच्या कडेला फेकून देण्यात आला. कांबळे माय-लेकाची मालमत्ता मिळविण्यासाठी हा कट रचण्यात आल्याची कबुली पाचही जणांनी दिली आहे. तपास सुरू असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

मामाच्या मुलानेच रचला कट

कोल्हापुरातून अटक करण्यात आलेला प्रणव रामटेके हा कांबळे यांच्या मामाचा मुलगा आहे. त्यानेच मालमत्ता हडपण्यासाठी हा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी

आर. के. नगर येथील वसंत कांबळे हे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

Web Title: Youth abducted from property in Kolhapur murdered, Five people were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.