नोकरीच्या आमिषाने युवकांची फसवणूक

By admin | Published: September 25, 2016 01:22 AM2016-09-25T01:22:32+5:302016-09-25T01:22:32+5:30

आजरा पोलिसांत गुन्हा : उत्तूर, गडहिंग्लज, राधानगरीच्या युवकांचा समावेश

Youth cheating with job bait | नोकरीच्या आमिषाने युवकांची फसवणूक

नोकरीच्या आमिषाने युवकांची फसवणूक

Next

उत्तूर : महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलव्यवस्थापन मंडळ पनवेल, महामंडळे, आदी ठिकाणी नोकरी लावतो म्हणून असंख्य युवकांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेऊन नोकरीचे आमिष दाखवले. मात्र, नोकरी न मिळाल्यामुळे फसगत झाल्याची तक्रार सुनील बाळू पोवार यांनी आजरा पोलिसांत दिली.
याबाबतची अधिक माहिती अशी, पोवार व त्यांचे नातेवाईक रामदास गोविंद पाटील (रा. सुरुपली, ता. करवीर), उत्तम शिवाजी गुरव (रा. बेगवडे, ता. भुदरगड) यांना राजू भेंडे, संतोष विष्णू नाईक (रा. उत्तूर, ता. आजरा), मकबूल महमद अली नदाफ (झोंड गल्ली, गडहिंग्लज), संपत तुकाराम सनस (रा. केंजळ, ता. जावळी. जि. सातारा) यांनी महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलव्यवस्थापन मंडळ पनवेल व महामंडळात नोकरी लावतो म्हणून पैसे घेतले. तसेच बोगस आॅर्डर दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पनवेल येथे जलसंधारण खात्यात पंप आॅपरेटर, तर कऱ्हाड, सातारा येथे महामंडळात विविध खात्यात नोकरी लावतो म्हणून मोठ्या प्रमाणात नियुक्तीचे बोगस आदेश दिले. आदेश पाहून युवक नोकरीच्या ठिकाणी गेले असता आरोपीकडून वेगवेगळी उत्तरे येऊ लागली. गेली दोन वर्षे हे युवक नोकरीच्या प्रतीक्षेत होते. आरोपी पैसे परत देत नसल्याने व नोकरीची शाश्वती नसल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.
सनस हा सातारा येथे बांधकाम विभागात नोकरीस आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सातारा, गडहिंग्लजकडे रवाना झाले आहे. यामध्ये नेमकी किती युवकांची फसगत झाली आहे, हे मात्र समजू शकले नाही. मात्र, हा आकडा फार मोठा आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र कदम, हवालदार शंकर कोळी, अनिल गाडीवड्ड , सुधाकर हुले करीत आहेत.

प्रत्येकी पाच लाख !
गेली दोन वर्षे सरकारी नोकरीसाठी कर्ज काढून युवकांनी नोकरीसाठी पाच लाखांपासून पुढे पैसे दिले. मात्र, अद्याप नोकरी नाही. गडहिंग्लज, उत्तूर, राधानगरी, भुदरगड या परिसरातील युवकांचा यामध्ये समावेश आहे. नोकरीच्या जाळ्यात युवकांना ओडण्यासाठी एजंट, पोट एजंट यांची साखळी उत्तूर परिसरात असल्याचे बोलले जात आहे, अशा एजंटाचे धाबे दणाणले आहेत.
फसगत झालेल्या युवकांना नेमणुकीचे आदेश बोगस दिल्याने कार्यालयात हजर करून घेतले नाही. आदेश पत्र एकच व नियुक्त्या सारख्याच त्यामुळे युवकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. थेट नियुक्ती नसल्याने फसगत झाल्याचे युवकांच्या लक्षात आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. अनेक युवक एजंट, पोट एजंट यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते. यातून लाखो रुपयांची माया एजंटांनी जमा केल्याचे समजते.
 

Web Title: Youth cheating with job bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.