कोल्हापुरात छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या
By admin | Published: June 20, 2016 01:02 AM2016-06-20T01:02:30+5:302016-06-20T01:02:49+5:30
बोंदे्रनगर धनगरवाडा येथील घटना, ‘सुसाईड नोट’मध्ये पाच संशयितांची नावे; एकजण ताब्यात
कोल्हापूर : वारंवार होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून फुलेवाडी-बोंद्रेनगर, धनगरवाडा येथील पल्लवी गणपती बोडेकर (वय १७) या युवतीने रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील जमावाने संशयितांच्या घरावर केलेल्या हल्ल्यात त्यांचे नातेवाईक मानाजी धाकू शेळके व सोनबा धाकू शेळके (दोघेही रा. धनगरवाडा, बोंद्रेनगर) हे जखमी झाले. या हल्ल्यात प्रापंचिक साहित्यासह दोन मोटारसायकलींची तोडफोड करण्यात आली. युवतीने लिहिलेल्या ‘सुसाईड नोट’मध्ये राजू सोनबा शेळके, संजय सोनबा शेळके, बबन शेळके, देवाप्पा बैजू बोडके, चौंडू बैजू बोडके (सर्व रा. धनगरवाडा, बोंद्रेनगर) यांची नावे असून यामधील राजू शेळकेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित फरारी संशयितांना पकडण्यासाठी दोन पथके तैनात केली आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. प्रचंड बंदोबस्तामुळे परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
अनाथ असलेली पल्लवी बोडेकर ही आपल्या लहान बहीण निकिता व आजीसह बोंद्रेनगर धनगरवाडा येथे राहत होती. ती आपले घर व लहान बहीण निकिता हिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी नागाळा पार्कात एका ठिकाणी धुण्या-भांड्याचे काम करत होती. यापूर्वी तिची याच परिसरातील संशयित युवकांनी अनेकवेळा छेड काढली होती. यासंदर्भात तिचे नातेवाईक व भागातील नागरिकांनी संबंधितांना समजदेखील दिली होती. सायंकाळी ती काम आटोपून घरी येत असताना नागाळा पार्क येथे देवाप्पा बोडकेसह अन्य पाच जणांच्या टोळक्याने तिची पुन्हा छेड काढली. घरी आल्यानंतर प्रचंड दडपणाखाली असलेल्या पल्लवीने बहिण निकिताला किराणाचे साहित्य आणण्यास दुकानात पाठविले. याचदरम्यान तीने घरी छताला ओढणीने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. निकिता दुकानातून साहित्य घेवून आल्यानंतर घराचे दार बंद दिसले. पल्लवी दार उघडत नसल्याने तिने आरडाओरडा केला. त्यानंतर परिसरातील लोक जमा झाले. त्यातील काही जणांनी छतावर जाऊन आत प्रवेश केल्यावर पल्लवीने ओढणीने गळफास लावून घेतल्याचे दिसले. तिच्याजवळ सुसाईड नोट (चिठ्ठी) दिसून आली. त्यामध्ये वरील संशयितांच्या छेडछाडीला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर संतप्त झालेल्या प्रचंड जमावाने थेट हातात काठ्या, दगड घेऊन परिसरातच असणाऱ्या संशयितांच्या घरावर चाल करून हल्ला चढविला. त्यामध्ये संशयिताचे नातेवाईक मानाजी व सोनबा धाकू शेळके हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात जमावाकडून घराची तोडफोड व प्रापंचिक साहित्याचे नुकसान करण्यात आले तसेच त्यांच्या दोन दुचाकींची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही वेळांतच करवीर पोलिस ठाण्याचा फौजफाटा दाखल झाला.. त्यातील संशयित राजू शेळके याला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर इतर संशयित फरार झाले. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तैनात करून तपास सुरू केला. रात्री उशिरापर्यंत संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम करवीर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)
संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
‘सुसाईड नोट’मध्ये नावे असणाऱ्या पाच संशयितांवर पल्लवी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितले.