कोल्हापूर: विद्युत करंटच्या सहाय्याने करत होता मासेमारी, मासा लागताच पाण्यात घेतली उडी अन्..
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 06:19 PM2022-11-01T18:19:22+5:302022-11-01T18:19:41+5:30
केवळ मोठा मासा पकडण्याच्या नादात जीवाला मुकला
धामोड: धामोड पैकी लाडवाडी (ता. राधानगरी ) येथील तुळशी नदी पात्रात विद्युत करंटच्या सहाय्याने मासेमारी करताना विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू झाला. अभिजित अर्जून हळदे (वय-२२, चाफोडी पैका दोनवडी ता. करवीर) असे मृत युवकाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित हळदे त्याच्या साथीदारांसोबत लाडवाडी येथे तुळशी नदीत विद्युत करंट सोडून मासेमारी करत होता. दरम्यान नदीतील पाण्यात आकडा टाकून करंट सोडला असता एक मोठ्ठा मासा पाण्यातून बाहेर आला. त्याला पकडण्यासाठी अभिजितने पाण्यात उडी घेतली. केवळ मोठा मासा लागताच त्याने आपण पाण्यात करंट सोडला आहे याचे भान न राखता थेट नदीपात्रात उडी घेतली. यावेळी त्याला विजेचा जोरदार झटका बसला व तो पाण्यात तडफडू लागला.
दरम्यान, त्याच्या साथीदारांनी विद्युत प्रवाह बंद करून त्याला बाहेर काढले व उपचारासाठी धामोड येथे आणले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात हलवले. दरम्यान त्याचा वाटेतच मृत्यु झाला. सीपीआर रूग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.