कोल्हापूरात लेसर लाईटमुळे दोघांच्या डोळ्यातून रक्तस्राव, एकाची दृष्टी मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 08:01 PM2024-09-08T20:01:58+5:302024-09-08T20:08:30+5:30

मिरवणूक काळात बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला लेसर किरणांमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले

Youth eye injured due to the intense glare of dangerous laser rays during the Ganesh Avagaman procession | कोल्हापूरात लेसर लाईटमुळे दोघांच्या डोळ्यातून रक्तस्राव, एकाची दृष्टी मंदावली

कोल्हापूरात लेसर लाईटमुळे दोघांच्या डोळ्यातून रक्तस्राव, एकाची दृष्टी मंदावली

संदीप आडनाईक

कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीतील लेसरच्या धोकादायक किरणांच्या प्रखर झोतामुळे उचगाव येथील एका तरुणाच्या डोळ्याला इजा झाली आहे. डोळ्यातून रक्तस्राव झाल्यामुळे हा तरुण प्रतिभानगर येथील डॉ. गायत्री होशिंग यांच्या मनोरमा हॉस्पिटल या नेत्ररुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची दृष्टी मंदावली आहे. या मिरवणूक काळात बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला लेसर किरणांमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नेत्र शल्यचिकित्सक संघटनेकडून माहिती मागवली आहे. या विषयावर ‘लोकमत’ने विशेष मालिका प्रसिद्ध केली होती.

उचगाव येथील गणेश मंडळांच्या एका मिरवणुकीत लेसर किरणांचा प्रखर विद्युतझाेत डोळ्यावर पडल्यामुळे आदित्य बोडके या ३२ वर्षीय तरुणाच्या डोळ्याला इजा झाली आहे. शनिवारी सायंकाळी ७:३० वाजता त्याची दृष्टी अचानक कमी झाली. गणपती मिरवणुकीत असताना अचानक लेसर किरणे डोळ्यात गेल्याने त्याला दिसेनासे झाले. डोळा लाल झाला होता. त्यातून पाणी वाहू लागल्यानंतर त्याने प्रतिभानगर येथील डॉ. गायत्री होशिंग यांच्या नेत्ररुग्णालयात तातडीने धाव घेतली. तपासणीत त्याच्या उजव्या डोळ्यातील १ मीटर आणि डाव्या डोळ्यात ६/६ इतकीच दृष्टी होती. उजव्या डोळ्यातील रेटिनाने मॅक्युला (रेटिनाच्या मध्यभागी) रक्तस्राव दिसून आला. त्याच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे. येत्या दोन दिवसांत त्याच्या डोळ्यांची संपूर्ण तपासणीनंतर त्याच्यावर याग हायलोईडेक्टॉमी उपचार सुरू करण्यात येणार आहेत. टेंबलाईवाडी येथे बंदोबस्ताला असणाऱ्या हवालदार युवराज पाटील यांच्या डोळ्यालाही लेसर किरणांमुळे इजा झाली आहे. त्यांचा उजवा डोळा लाल होऊन सूज आल्याने दृष्टी कमी झाली आहे. त्यांनाही राजारामपुरी येथील डॉ. मंदार जोगळेकर यांच्या नेत्ररुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेत्र शल्यचिकित्सक संघटनेकडून मागवली माहिती

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक संघटनेचे अध्यक्ष डॉ. चेतन खारकांडे आणि सचिव डॉ. मंदार जोगळेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी २७ ऑगस्ट रोजीच जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गणेशोत्सव काळात लेसर किरणांच्या वापरावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलिसांकडून डॉ. होशिंग यांच्याकडून माहिती घेतली आहे. याबाबत वरिष्ठांकडे अहवाल देण्यात येणार आहे. दरम्यान, मिरवणुकीत डीजे आणि लेसरचा वापर करणाऱ्या मंडळांवर जागेवरच कारवाई करावी आणि सर्वच मंडळांकडून नेत्रोपचाराचा खर्च वसूल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
 

Web Title: Youth eye injured due to the intense glare of dangerous laser rays during the Ganesh Avagaman procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.