युवापर्व; मात्र घराणेशाहीतच सर्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:21 AM2019-09-18T00:21:19+5:302019-09-18T00:21:23+5:30
पोपट पवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून सध्या युवकांना संधी देण्याचा डांगोरा पिटला जात ...
पोपट पवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून सध्या युवकांना संधी देण्याचा डांगोरा पिटला जात असला तरी ज्यांना आखाड्यात उतरविण्याची तयारी केली जात आहे, अशा बहुतांश युवकांची पार्श्वभूमी तपासली तर राज्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा प्रस्थापित घराण्यांकडेच उमेदवारीचा रतीब घातला जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, विधानसभेच्या रणांगणातच अनेकांनी वंशपरंपरेने लाँचिंग करण्याची धडपड चालविल्याने चांद्यापासून बांद्यापर्यंत घराणेशाहीची मुळे प्रबळ होताना दिसत आहेत.
‘पवार पर्व’ सुरू राहण्यासाठी नातू रोहित पवार यांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी त्यांनी नगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघाची निवड केली आहे. रोहित यांनी दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या शिवसेनेच्या ‘युवराजां’नाही सुरक्षित मतदारसंघ देण्यासाठी सेनेच्या आमदारांमध्ये चढाओढ लागली आहे. राज्याच्या राजकीय सारिपाटावर ‘आदित्योदय’ करण्यासाठी जळगाव ग्रामीण, मालेगाव पूर्व व वरळी विधानसभा मतदारसंघांतून ‘आवतण’ दिले गेले आहे. तिकडे माजी मंत्री सुनील तटकरे यांनाही आपला वारसदार विधानसभेत पाठविण्याची घाई झाली आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून कन्या आदिती तटकरे यांच्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
काँग्रेसमधून भाजपवासी झालेले जिंतूरचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनाही कन्येच्या राजकीय कारकिर्दीला आयाम द्यायचा आहे. जिंतूर मतदारसंघातून मेघना यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. औरंगाबादच्या गंगापूर मतदारसंघातून माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे पुत्र संतोष यांचे नावही शिवसेनेकडून आघाडीवर आहे.
बीडमध्ये वारसदारांच्या लाँचिंगसाठी धडपड सुंदरराव सोळुंके, गोपीनाथ मुंडे, केशरकाकू क्षीरसागर अशा मातब्बर नेत्यांचा जिल्हा असलेल्या बीडमध्ये घराणेशाहीची परंपरा नेटाने चालविली जात आहे. माजी मंत्री विमलताई मुंदडा यांच्या सूनबाई नमिता यांना केजमधून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गेवराईतही माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी पुत्र विजयसिंह यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. स्वत: भाजपकडून विधान परिषदेचे सदस्य असूनही आष्टीच्या सुरेश धस यांना पुत्र जयदत्त यांच्या करिअरची चिंता लागून राहिली आहे. आष्टी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न आहे.
रामदास
कदम यांनाही
पुत्राची काळजी
खेड-गुहागर मतदारसंघात पराभव पदरी पडल्याने मागील दाराने जात मंत्रिपद मिळविणारे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना दापोलीतून पुत्र योगेश कदम यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे.