आजऱ्यात युवा महोत्सवाचा जल्लोष
By admin | Published: October 1, 2016 12:29 AM2016-10-01T00:29:48+5:302016-10-01T00:40:37+5:30
शानदार उद्घाटन : युवा महोत्सवातून तरुणाईला विधायक दिशा : डी. आर. मोरे
आजरा : बहुतांशी महाविद्यालयांची स्नेहसंमेलने बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. एकूण लोकसंख्येमध्ये सर्वाधिक तरुण लोकसंख्या आहे, अशी ओळख असणाऱ्या युवा शक्तीला विधायक दिशेने पुढे नेण्याचे काम युवा महोत्सवातून केले जात आहे, असे प्रतिपादन ‘बीसीयूडी’चे संचालक (शिवाजी विद्यापीठ) डॉ. डी. आर. मोरे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व आजरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३६ व्या कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी प्राचार्य डॉ. एम. एल. होनगेकर म्हणाले, केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा कलेची जोपासना करणेही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मिळाल्यास विद्यार्थी यशाच्या अत्युच्य शिखरावर पोहोचू शकतो, हे अनेक व्यक्तींनी दाखवून दिले आहे.
डॉ. मोरे म्हणाले, नॅक कमिटीच्या परीक्षणानंतर युवा महोत्सवाचे यजमानपद घेण्यासाठी अलीकडे बरीच महाविद्यालये उत्सुक असतात. परंतु, अनेक कसोटीवर महाविद्यालयांचा कस लावून यमजानपद दिले जाते. यामुळेच आजरा महाविद्यालयास हे यजमानपद मिळाले आहे.
सिने अभिनेते संतोष शिंदे म्हणाले, युवा महोत्सवातूनच आपली जडणघडण झाली. भविष्यातील कलाकार घडविण्याचे काम युवा महोत्सव करीत आहेत. व्यासपीठ गाजविण्यासाठी येथे मिळणारा आत्मविश्वास आयुष्यभर उपयोगी पडतो. अध्यक्षीय भाषणात जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, युवकांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या कामात आपणही खारीचा वाटा उचलला असून, नियोजनात कोणतीही उणीव राहणार नाही. परीक्षकांनीही योग्य तो न्याय देऊन स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे. यावेळी डॉ. आर. व्ही. गुरव यांनीही मार्गदर्शन केले.
उद्घाटन समारंभास डॉ. अनिल देशपांडे, श्रीमती अन्नपूर्णादेवी चराटी, अजित चराटी, एम. एल. चौगुले, विलास नाईक, डॉ. दीपक सातोस्कर, विजयकुमार पाटील, दिनेश कुरुणकर, रमेश कुरणकर, प्राचार्य युवराज गोंडे, डॉ. पी. एम. पाटील, मारुती मोरे, प्राचार्य मंगलकुमार पाटील, आय. के. पाटील, व्ही. एम. पाटील, पोलिस निरीक्षक रवींद्र कदम, स्पर्धक विद्यार्थी, मार्गदर्शक उपस्थित होते. डॉ. आनंद बल्लाळ यांनी आभार, प्रा. रमेश चव्हाण व डॉ. अशोक बाचूळकर यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान, स्पर्धेत उत्तूर येथील डॉ. जे. पी. नाईक महाविद्यालयाच्या संघाने लोकनृत्यावर सर्वांना डोलायला लावले. तर हातकणंगले येथील अण्णा डांगे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लघुनाटिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. (प्रतिनिधी)