वस्तूंच्या संग्रहातून तरुण जपतोय इतिहासाच्यापाऊलखुणा
By admin | Published: February 10, 2015 11:16 PM2015-02-10T23:16:22+5:302015-02-10T23:52:41+5:30
फिरते संग्रहालय : बहिरेवाडीच्या अरविंद भोसलेचा उपक्रम; वर्षभरात भरवली दहा प्रदर्शने
दिलीप चरणे -नवे पारगाव -बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील अरविंद भोसले या युवकाने ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद जोपासला आहे. नागरिकांना इतिहासाचे महत्त्व पटवून देऊन इतिहासावरची विश्वासार्हता वाढविण्यासाठी त्याने संग्रही असणाऱ्या ऐतिहासिक वस्तूंचे फिरते प्रदर्शन भरविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. वर्षभरात त्याने दहा प्रदर्शने भरवली आहेत.
वारणा खोऱ्यातील बहिरेवाडी सारख्या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील अरविंद भोसले याचे शेतातील कामे करत महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे. वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याने अनेक ऐतिहासिक ग्रंथ वाचले. इतिहासाच्या प्रा. डॉ. मंजुश्री पवार यांच्याकडून मार्गदर्शन व प्रेरणा मिळत गेली आणि इतिहासाची आवड वाढत गेली. यातूनच डॉ. मंजुश्री पवार यांच्या समवेत त्याने विविध किल्ले, जुने वाडे, वस्तुसंग्रहालय, पुराभिलेखागार याची पाहणी केली. इतिहासाच्या पाऊलखुणांचे अवलोकन केले. यातून इतिहासाची गोडी वृद्धिंगत झाल्याने त्याने पुरातन वस्तू शोधण्यासाठी व जतन करण्यासाठी अनेक गडकोट, किल्ल्यांना भेटी दिल्या.
या शोधमोहिमेत बहिणीच्या शेतामध्ये त्याला एक शिवकालीन व दोन मुघलकालीन नाणी सापडली. त्यानंतर ऐतिहासिक वस्तू जतन करण्याचा कल वाढत गेला. लोकांना इतिहासाचे महत्त्व समजावे, त्यांचा विश्वास बसावा याकरिता त्याने वस्तू, नाणी, शस्त्रे, कागदपत्रे, जुन्या लाकडी वस्तू, महात्मा गांधी युगातील चरखा, डाव, रवी, राजर्षी शाहूकालीन स्टॅम्स, धान्य मोजण्याचा १९१० सालचा शेर, इत्यादी वस्तू संग्रहित केल्या. आजमितीस त्याच्याकडे आठशेहून अधिक नाणी आहेत. शिवकालीन, मुघलकालीन, ब्रिटिशकालीन विदेशी चलन, शस्त्रे, शिवकालीन तलवार, भाला, ऐतिहासिक कागदपत्रे, इत्यादींचा ऐतिहासिक खजिना त्याच्या संग्रहात आहे. ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू यांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने अरविंद प्रबोधनाचे काम करीत आहे. ऐतिहासिक वस्तू संग्रह करताना जनतेतून त्याला चांगले सहकार्य लाभले. तो शाळा, हायस्कूल, महाविद्यालयात हे फिरते प्रदर्शन विनामूल्य भरवत आहे. त्याला या कार्यासाठी प्रा. डॉ. मंजुश्री पवार, पुराभिलेख कार्यालयाचे सहायक संचालक गणेश खोडके यांचे सहकार्य लाभत आहे.