युथ आयकॉन - भावेश पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:24 AM2021-03-19T04:24:14+5:302021-03-19T04:24:14+5:30
आपण ज्या वातावरणात वाढतो, जगतो, त्याचे संस्कार आपल्याला आयुष्यभर सावलीसारखी साथ करत असतात. गुजरात कच्छसारख्या प्रदेशातून आलेला कच्छ कडवा ...
आपण ज्या वातावरणात वाढतो, जगतो, त्याचे संस्कार आपल्याला आयुष्यभर सावलीसारखी साथ करत असतात. गुजरात कच्छसारख्या प्रदेशातून आलेला कच्छ कडवा पाटीदार समाज म्हणजे बालपणापासूनच उद्योजकतेचे बाळकडू आणि मुळं रुजलेला समाज. आयुष्यभर दुसऱ्याची नोकरी करून त्यांना मोठं करण्यापेक्षा स्वत: व्यवसायाचे मालक बना.. या संस्कारातच त्यांची जडणघडण झाली. कोल्हापुरातील सॉ मिल इंडस्ट्रीजचे पायोनिअर असलेल्या वाडवडिलांनी लावलेल्या कोल्हापूर सॉ मिल या रोपट्याला आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान, गुणवत्ता, ग्राहकाची गरज ओळखून बदलांचा स्वीकार यांचे खतपाणी घालून भावेश पटेल यांनी त्याचा वटवृक्ष केला. कृषी पंप, ऑटोमोबाईल, फौंड्रीतील स्पेअर पार्टस्, मोठ्या मशिनरी, कंपोनंटस, फॅब्रिकेशन, टेक्सटाईल, फूड इंडस्ट्री, मेडिकल अशा ग्राहकांच्या मोठ्या मशिनरी, वस्तूंचे पॅकिंग करून ते सुस्थितीत देश-परदेशात पोहोचविले जाते. या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने व्यवसाय विस्तार करणाऱ्या उद्योजकांत पश्चिम महाराष्ट्रात भावेश पटेल यांचे नाव अग्रस्थानी आहे.
उद्योगधंद्यासाठी कच्छमधून १९५२ ला कोल्हापुरात व्यवसायासाठी आलेले नावजीभाई पटेल यांनी व्यवसायात श्रीगणेशा केला. पुढे सॉ मिल सुरू केली. लाकडापासून साहित्य बनवून त्याचा व्यापार, कौलं, रूफिंग, शहाबादी, काडाप्पा फरशी असा प्रवास केल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरिभाई पटेल यांनी १९७३ ला कोल्हापूर सॉ मिलची स्थापना केली. त्याचा विस्तार १९७८ मध्ये शिरोली एमआयडीसीमध्ये कोल्हापूर वूडन पॅकिंग सॉ मिल आणि १९८२ ला गोकुळ शिरगावमध्ये कोल्हापूर टिंबर अँड फर्निचर अशा तीन युनिटमध्ये झाला. वडील हरिभाई यांनी ठेवलेली ही उद्योगाची चढती कमान पाहत मोठे झालेल्या भावेश यांनी प्रायव्हेट हायस्कूल, एस. एम. लोहिया हायस्कूल आणि पुढे नागपूरला लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बी टेक असा शैक्षणिक प्रवास केआयटीमधील एमबीएने पूर्ण केला. एकत्र कुटुंबातील ते सर्वांत मोठे बंधू असल्याने सॉ मिलची जबाबदारी आली आणि २००७ मध्ये त्यांचा उद्योजक म्हणून प्रवास सुुरू झाला.
आपल्या आधुनिक ज्ञानाचा उपयोग करत त्यांनी व्यवसायात बदल घडवायला सुरुवात केली, कामाचे ऑटोमेशन झाले, अकौंटिंगचे संगणकीकरण, ऑनलाईन व्यवहार सुरू झाल्याने अर्थकारणाचा ताळमेळ बसला. किमतीचे मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग झाले. पूर्वी इंडस्ट्रीअल पॅकिंगसाठी आधी कंपन्यांना साहित्य मुंबई-पुण्याला पाठवावे लागायचे. तेथून पुन्हा कोल्हापुरात आणून ग्राहकाला पाठवायचे, असा दुहेरी प्रवास आणि खर्चही व्हायचा. ही अडचण ओळखून भावेश यांनी उत्पादन तयार होते त्याचठिकाणी (सर्व्हिस ऑन प्लान्ट) माणसं पाठवून पॅकेजिंग सुरू केले. त्यामुळे कंपन्यांचा त्रास वाचला. उद्योगाला नवे पंख देत सांगलीला नवीन पद्धतीने बॉक्स बनविण्याचे युनिट उभारले.
प्रवासात मशिनरी-पार्टस् गंजू नये यासाठी आवरणं घातली जातात. वाहतूक करणे सोपे व्हावे यासाठी बेल्टस, पॅलेट लावले जातात. लाकडाला वाळवी, कीड लागू नये यासाठी त्यावर हीट ट्रिटमेंट केली जाते. महाराष्ट्रात मुंबईनंतर केवळ कोल्हापूर सॉ मिलकडे या प्रक्रियेचे हे आयएन४३ कोडचे लायसन्स आहे. ज्याचे मॉनिटरिंग कृषी मंत्रालयाकडून केले जाते. एका युनिटमधून किमान ५० ग्राहकांना सर्व्हिस दिली जाते, इतका त्याचा विस्तार झाला आहे.
----
भावेश पटेल यांच्या या उद्योगाची उलाढाल आता वार्षिक १५ कोटींंच्यावर असून, नऊजणांचा कुशल कर्मचारी वर्ग आहे. त्यांच्या प्लान्टला ग्रीन इनिशिएटिव्ह पुरस्कार मिळाला आहे. ते स्वत: फाईव्ह स्टार एमआयडीसी असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ऑफ कागल अशा संस्थांवर कार्यरत आहेत. तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतात. उद्योगात रोज येणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बाजारपेठेची गरज ओळखा, व्यवसायातील आधुनिक बदलांचा अभ्यास करा, खाचखळग्यांतून गाठीशी येणारे अनुभव आपले गुरू असतात, त्यांचा सकारात्मक आणि कृतिशील स्वीकार करा, असे ते सांगतात.