माजनाळ येथील युवकाची कर्ज प्रकरणाच्या नैराश्येतून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:30 AM2021-08-25T04:30:42+5:302021-08-25T04:30:42+5:30
दरम्यान, कर्ज प्रकरण मंजूर असतानाही पैसे देण्यास पुनाळ येथील के.डी.सी. बँक शाखेतील बँक निरीक्षक यांनी टाळाटाळ केल्याबद्दल त्यांची ...
दरम्यान, कर्ज प्रकरण मंजूर असतानाही पैसे देण्यास पुनाळ येथील के.डी.सी. बँक शाखेतील बँक निरीक्षक यांनी टाळाटाळ केल्याबद्दल त्यांची चौकशी करण्याबाबत माजनाळ ग्रामस्थांनी निवेदन कळे पोलीस ठाण्यात दिले, तर मृत जयचे मामा निवास चौगले यांना फोनवरून बँक निरीक्षकाचे वडील आनंदा बेलेकर यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याबद्दल कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, माजनाळ येथील जय बाळासोा डवंग यांनी आण्णासाहेब पाटील महामंडळाकडे व्यवसायासाठी कर्ज प्रकरण दाखल केले होते. तीन महिन्यांपूर्वी आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचे त्यांचे प्रकरण मंजूर करण्यात आले होते. पण पुनाळ ( ता. पन्हाळा ) येथील के.डी.सी. बँकेत कार्यरत असणारे बँक निरीक्षक हे गेले तीन महिने कर्ज प्रकरणाचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. यातून मंजूर कर्ज प्रकरणाचे पैसे मिळत नसल्याने जयने विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपवली.
त्यामुळे माजनाळ ग्रामस्थांच्यावतीने मंगळवारी कळे पोलीस ठाण्यात एकत्र येऊन, कर्ज प्रकरण मंजूर असतानाही पैसे देण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पांडुरंग पाटील, युवराज पाटील, कृष्णात डवंग, सरदार पाटील व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, संबंधित बँक निरीक्षकाचे वडील आनंदा बेलेकर यांनी मृत जय डवंग यांचे मामा निवास चौगले यांना फोनवरून, या प्रकरणात पडू नकोस, जर पडल्यास बघून घेण्याची धमकी दिली असल्याने त्यांच्याविरोधात निवास चौगले यांनी कळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास कळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
फोटो जय डवंग