युवा शाहू, ग्रंथ पुरस्कार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:41 AM2018-10-04T00:41:25+5:302018-10-04T00:41:29+5:30
इंदूमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा राजर्षी युवा शाहू पुरस्कार व राजर्षी शाहू ग्रंथ पुरस्कार गेल्या काही वर्षांपासून बंद पडला आहे, तर सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक उपक्रमांसाठी नेमलेल्या उपसमित्या बरखास्तच झाल्या आहेत. त्यामुळे ट्रस्टच्या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.
शाहू स्मारक ट्रस्टचे काम केवळ हॉल किंवा कलादालन भाड्याने देण्याचे नाही, तर कलासाहित्य संस्कृतीच्या चळवळीत उपक्रमशीलतेने पुढाकार घेणे हा उद्देश आहे. तशी ट्रस्टची स्वतंत्र घटना आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ट्रस्टच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथमहोत्सव, परिसंवाद, कविसंमेलन, चित्रपट महोत्सव, चर्चासत्र, कलाप्रदर्शने, संमेलने असे विविधांगी कार्यक्रम घेतले जात होते. या क्षेत्रांमध्ये स्वत:चे विशेष स्थान निर्माण केलेल्या युवा पिढीला प्रोत्साहन मिळावे यासाठी युवा शाहू पुरस्कार दिला जात होता. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, लेखिका सोनाली नवांगुळ यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते, तर ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. आ. ह. साळुंखे यांना राजर्षी शाहू ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची बदली झाल्यानंतर हे पुरस्कार बंद पडले.
देशमुखांच्या काळात कार्यक्रमांच्या संयोजनासाठी उपसमित्या नेमण्यात आल्या होत्या, त्यात प्राचार्य अजेय दळवी, विजय टिपुगडे, मंजुश्री पवार, आझाद नायकवडी, सागर बगाडे यांच्यासह साहित्य कला क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. या उपसमित्यांमुळे उपक्रमांचे संयोजन आणि नियोजन केले जात होते. त्या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण व्हायची; पण या समित्याही नंतर बंद पडल्या.
जिल्हा प्रशासनाचे ट्रस्टच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने कोणीही या, काहीही करा अशी स्थिती आहे. शिवाय कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत योगदान न दिलेल्या ट्रस्टच्या एका कर्मचाऱ्याला ढीगभर पुरस्कार मिळतातच कसे, हे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येथील गैरकारभार कळाल्यानंतर काही सामाजिक संघटनांनी यापूर्वीच जिल्हाधिकाºयांना निवेदनाद्वारे कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
कमर्शियल वापर
शाहू स्मारक भवनचे मोठे कलादालन काही महिन्यांसाठी कपड्यांच्या सेलसाठी वापरले जाते. वरचा हॉल खादी व कॉटन सेलला किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सेलला दिला जातो. ट्रस्टला अडचणी आहेत; त्यामुळे एकवेळ पुस्तकांचा सेल समजून घेता येईल; पण कपड्यांचे व वस्तूंचे सेल लावणे या वास्तूसाठी योग्य नाही, असे या क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे.