भ्रष्टाचाराच्या निपटाऱ्यासाठी तरुणांनी पुढे यावे

By admin | Published: October 6, 2015 12:07 AM2015-10-06T00:07:32+5:302015-10-06T00:28:47+5:30

तौसिफ मडिकेरी : विद्यापीठातील नेहरू अभ्यास केंद्राचा राष्ट्रीय परिसंवाद

Youth should come forward to deal with corruption | भ्रष्टाचाराच्या निपटाऱ्यासाठी तरुणांनी पुढे यावे

भ्रष्टाचाराच्या निपटाऱ्यासाठी तरुणांनी पुढे यावे

Next

कोल्हापूर : दहशतवादाचा मुद्दासुद्धा धर्माशी कमी आणि आर्थिक बाबींशी अधिक निगडित आहे. व्यवस्थांमधील भ्रष्टाचार हा सुद्धा अशा गोष्टींना खतपाणी घालणारा ठरतो. त्याचा निपटारा करण्यासाठी तरुणांनीच पुढे यायला हवे, असे आवाहन विचारवंत तौसिफ मडिकेरी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्रातर्फे आयोजित ‘मॉडर्न इंडियन आयडिया आॅफ स्टेट अँड पॉलिटिक्स’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.मडिकेरी म्हणाले, धार्मिक सहिष्णुता व सामाजिक सलोखा ही भारतीय समाजाची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. तथापि, ब्रिटिशांनी भारतीय वसाहतीचा विस्तार करून तिला स्थैर्य प्राप्तीसाठी ‘फोडा व राज्य करा’ या नीतीचा अवलंब केला. त्याला पूरक अशी शिक्षणपद्धती येथे रूजवली आणि ब्रिटिश वसाहतवादी नीतीला पूरक असा इतिहास निर्माण केला. त्या इतिहासाचा राजकारणासाठी जाणीवपूर्वक वापर केला जातो आहे. इतिहास हा भावनाप्रधानतेची बाब नसून सातत्यपूर्ण संशोधनाची गोष्ट आहे. संवाद, चर्चा आणि संशोधन यांच्या बळावरच भारतीय इतिहासाची पुनर्मांडणी करणे शक्य आहे. जातीयवाद, भांडवलशाही ही भारतीय समाजासमोरील आजघडीची सर्वांत महत्त्वाची दोन आव्हाने आहेत. भारताच्या तथाकथित प्रगतीचे, वृद्धीचे लाभ तळागाळांतील वंचित, शोषित, अल्पसंख्याक, शेतकरी-कष्टकरी समाजापर्यंत पोहोचत नाहीत. त्याचा फायदा भांडवलदारांना होतो.
डॉ. शिंदे म्हणाले, प्राचीन भारताच्या इतिहासाच्या बहुसांस्कृतिकतेचा, त्यातील सहिष्णुतेच्या बीजांचा अभ्यास करायला हवा. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याची आपली संस्कृती आहे. ती पुढे न्यायला हवी. कार्यक्रमास राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील, डॉ. प्रकाश पवार, भगवान माने, केतन गोवेकर उपस्थित होते. नेहरू अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. वासंती रासम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रवींद्र भणगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

साखरेच्या बाहुल्यांची गरज
मातीची बाहुली पाण्यात ठेवली, तर ती पाणी गढूळ करते. कापसाची बाहुली सारे पाणी शोषून घेते. साखरेची बाहुली सारे पाणी गोड बनविते. या पहिल्या दोन बाहुल्या अनुक्रमे जातीयवाद व भांडवलशाहीचे प्रतीक आहेत, ज्यांच्यामुळे समाजमन कलुषित, समाजाचे शोषण होते. भारतीय समाजाला साखरेच्या बाहुलीसारख्या नेतृत्वाची गरज असल्याचे मत मडिकेरी यांनी व्यक्त केले.

Web Title: Youth should come forward to deal with corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.