लोकशाहीसाठी युवकांनी संघर्ष कायम ठेवावा
By Admin | Published: February 28, 2016 12:37 AM2016-02-28T00:37:11+5:302016-02-28T00:37:11+5:30
विश्वजित कुमार : ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ परिषद
कोल्हापूर : देशात मागासांना मिळणारे आरक्षण हटविण्याची भाषा सरकारकडून सुरू आहे; त्यामुळे संविधान व मूलभूत अधिकार अडचणीत येत आहेत. सद्य:परिस्थितीत निर्माण झालेल्या झुंडशाहीतून लोकशाही वाचविण्यासाठी युवकांकडे मोठी जबाबदारी आली आहे. यासाठी मशालींनी मशाली पेटवून युवकांनी संघर्ष तेवत ठेवावा, असे आवाहन ‘एआयएसएफ’चे राष्ट्रीय सचिव विश्वजित कुमार यांनी व्यक्त केले.
आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, विद्रोही संघटना, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन आॅफ इंडिया, आॅल इंडिया यूथ फेडरेशन, युनायटेड बी स्टँड, पुरोगामी युवक व विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे शनिवारी येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ ही परिषद झाली. यात प्रमुख पाहुणे म्हणून कुमार बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेत्या मुक्ता मनोहर होत्या.
विश्वजित कुमार म्हणाले, गोविंद पानसरे, दाभोलकर व कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. याच्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाप्रमाणेच दिल्लीतील संघर्षही तितकाच महत्त्वाचा आहे. संविधानाची शपथ घेऊन आलेले हे सरकार सध्या जातिपातीचे राजकारण करीत आहे. ‘जेएनयू’च्या प्रतिष्ठेला बाधा आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात उठलेल्या संघर्षाचा आवाज तीव्र होत आहे. ज्येष्ठ नेत्या मुक्ता मनोहर म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण २६ टक्क्यांनी वाढले असतानाही सरकारच्या आदेशावरून राष्ट्रीयीकृत बँकांनी उद्योगपतींची कर्जे माफ केली आहेत. पण, सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारही केलेला नाही. सरकारच्या या प्रवृत्तीविरोधात लोकशाही मार्गाने लढण्याची गरज आहे. यावेळी पंकज चव्हाण, गिरीश फोंडे यांनीही सरकारच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी अनिल चव्हाण, बाबासाहेब देवकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)