युवकच नवभारत घडवितील, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास
By पोपट केशव पवार | Published: December 1, 2023 04:47 PM2023-12-01T16:47:15+5:302023-12-01T16:49:55+5:30
कोल्हापूर : देशात सध्या १८ ते २८ या वयोगटातील तरुणाईंची संख्या सर्वाधिक आहे. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पेनेत तरुणाईला मोठ्या प्रमाणात ...
कोल्हापूर : देशात सध्या १८ ते २८ या वयोगटातील तरुणाईंची संख्या सर्वाधिक आहे. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पेनेत तरुणाईला मोठ्या प्रमाणात केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यामुळे हे युवकच येणारा नवभारत घडवतील, असा विश्वास गाेव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
'आत्मनिर्भर भारत: युवकांचा सहभाग' या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात डॉ. सावंत बोलत होते. कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना आम्ही पूर्णत्वास नेली आहे. दुध, भाजीपाल्यासाठी गोवा पूर्णपणे महाराष्ट्र व कर्नाटकवर अवलूबन होते. हेच अवलंबित्व कमी करण्यासाठी गावागावात जाऊन नागरिकांची गरज, अपेक्षा जाणून घेतल्या. आपण काय करू शकतो, सरकार काय देऊ शकते याचा अभ्यास करून त्यादृष्टीने योजना आखल्या. त्याच्या अंमलबजावणीसाठी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना गावे नेमून दिली. हर घर नल, प्रत्येक घरी गॅस, शौचालय, वीज दिली. याची गावागावात प्रभावी अंमलबजावणी झाल्याने गोवा आज स्वयंपूर्ण झाले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राने जलयुक्त शिवार योजना प्रभावी राबवून २२ हजार गावे पाणीदार केली आहेत. शेतकऱ्यांना पिक विमा, पिकांना हमीभाव यामुळे शेतकऱ्याचा मार्ग सुकर होत आहे. नव्या शैक्षणिक धोरणात थेरीपेक्षा प्रॅक्टिलला महत्व दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपण जे शिकतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.
प्रभावी योजनांद्वारे अवलंबित्व कमी केले
सरकार तुमच्या दारी, स्वयंपूर्ण युवा, स्वयंपूर्ण जेल, ग्रीन स्कूल अशा संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणल्या. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ई-बाजार सुरु केला. यामुळे गोव्यातील नागरिकांना आज दुसऱ्यावर अवलंबून राहवे लागत नसल्याचे डॉ. सावंत म्हणाले.