नोकरी मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:46 AM2019-02-11T00:46:38+5:302019-02-11T00:46:43+5:30
कोल्हापूर : नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून कदमवाडी येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी दुपारी उघडकीस आले. ...
कोल्हापूर : नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून कदमवाडी येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी दुपारी उघडकीस आले. महेश मारुती खाडे (वय २४, मूळ रा. मुसळवाडी, ता. राधानगरी) असे त्याचे नाव आहे.
खाडे याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले होते. तो दोन खासगी ठिकाणी नोकरी करीत होता. तेथून त्याला कमी केल्याने तो वैफल्यग्रस्त झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, मारुती खाडे व त्यांचे कुटुंबीय मूळचे मुसळेवाडी गावचे. गेल्या पंधरा वर्षांपासून ते कदमवाडी येथे भाड्याने राहतात. त्यांचा मुलगा महेश हा उच्चशिक्षित होता. त्याचा स्वभाव शांत व मनमिळाऊ असल्याने परिसरातील लोक त्याचे कौतुक करायचे. चांगली नोकरी मिळत नसल्याने तो काही दिवस शहरातील एका औषध दुकानात काम करीत होता. तेथून कामावरून कमी केल्यानंतर तो एका खासगी कंपनीत नोकरीला लागला. चार महिने काम केल्यानंतर तेथूनही त्याला कमी करण्यात आले. काम नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून तो घरीच होता. त्याचे वडील खासगी नोकरी करतात.
महेश रविवारी सकाळी वडिलांना सोडण्यासाठी दुचाकीवरून रेल्वे स्थानक येथे गेला. तेथून घरी आल्यानंतर त्याने आई बाहेर गेल्याचे पाहून नायलॉनच्या दोरीने छताच्या हुकास गळफास घेऊन आत्महत्या केली. आई घरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांची आरडाओरड ऐकून गल्लीतील लोक जमा झाले. त्यांनी शाहूपुरी पोलिसांत वर्दी दिली. सीपीआर रुग्णालयाच्या शवागृहाबाहेर नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
आईची काळजी घ्या
कामावर जाण्यासाठी वडिलांनी महेशला दुचाकीवरून रेल्वेस्थानकावर सोडण्यास सांगितले. घरातून बाहेर पडताना त्याने वडिलांना मिठी मारली. अश्रू ढाळत ‘बाबा, आईची काळजी घ्या’ असे सांगितले. त्याच्या या बोलण्याचे वडिलांना आश्चर्य वाटले. ‘इतका हळवा होऊ नकोस,’ असे म्हणून त्यांनी त्याची समजूत काढली. दोघेही दुचाकीवरून रेल्वेस्थानकावर आले. तो वडिलांना सोडून घरी आला. त्यानंतर काही वेळातच महेशने आत्महत्या केल्याचा निरोप वडिलांना मिळाल्यानंतर जोराचा मानसिक धक्का बसला