Kolhapur News: तरुणांच्या आत्महत्यांनी वाकरे हादरले, अंधश्रद्धेच्या अफवांना ऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 01:51 PM2023-02-02T13:51:59+5:302023-02-02T13:53:17+5:30

तरणीताठी मुले मृत्यूला कवटाळत असल्याने पालकांची चिंता वाढली

Youth's suicide stirs excitement in Vakre village of Kolhapur district, Superstitious rumours | Kolhapur News: तरुणांच्या आत्महत्यांनी वाकरे हादरले, अंधश्रद्धेच्या अफवांना ऊत

Kolhapur News: तरुणांच्या आत्महत्यांनी वाकरे हादरले, अंधश्रद्धेच्या अफवांना ऊत

googlenewsNext

प्रकाश पाटील

कोल्हापूर : कोणतेच फारसे गंभीर कारण नसताना वाकरे (ता. करवीर) येथील चार अविवाहित तरुणांनी गेल्या दीड महिन्यात आत्महत्या केल्याने गाव हादरला आहे. तरणीताठी मुले मृत्यूला कवटाळत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. आत्महत्या केलेले चारपैकी तिघेजण वाकरे पैकी पोवारवाडी येथील एकाच गल्लीत राहणारे आहेत. पाचजण आत्महत्या करणार असल्याची अफवा गावात असून, त्यामागे काही अंधश्रद्धा आहे का, याचा शोध घेण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पहिल्या दोन आत्महत्या झाल्यावर तू का अजून आत्महत्या केली नाहीस, असे तिसऱ्या तरुणाच्या स्वप्नात आले होते, अशीही चर्चा गावात आहे.

युवराज पोवार याने पहिल्यांदा आत्महत्या केली. तो खासगी कंपनीत कामाला होता. त्यानंतर चारच दिवसांत शुभम पोवारने आत्महत्या केली. एकाच गल्लीत शेजारी राहणाऱ्या भाऊबंद व जीवलग मित्रांनी आत्महत्या केल्याने गाव हादरला. या आत्महत्या होऊन १५ दिवस होतात न होतात तोपर्यंत दुचाकी मेस्त्री असणाऱ्या नितीन मोरे याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. ही आत्महत्या गावकरी विसरतात तोपर्यंत मंगळवारी (दि. ३१ जानेवारी) विशाल कांबळे याने आत्महत्या केली. विशाल फरशी फिटिंगचे काम करत होता.

या चौघांचीही घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. शुभम हा आई-वडिलांना एकुलता होता. तो वडिलांच्याबरोबर कोल्हापूर येथे सुवर्ण कामासाठी जात होता. आई-वडिलांच्या सानिध्यात असताना तो भावना व्यक्त करत नसल्याने पालकांनाही त्यांच्या मनात काय चालू आहे, याचा अंदाज आला नाही. सर्व काही सुरळीत सुरू असताना या तरुणांनी जीवन संपवण्याचा घेतलेला निर्णय कुटुंब उद्ध्वस्त करणारा ठरत आहे.

जीवघेणी अफवा

गेल्या दीड महिन्यात वाकरेमध्ये चौघांनी आत्महत्या केली. हातातोंडाशी आलेल्या मुलांचे आत्महत्येचे सत्र सुरू असल्याने पालक व ग्रामस्थांच्यात चिंतेचे वातावरण आहे. गावातील पाच तरुण आत्महत्या करणार असल्याची अफवा पहिल्या आत्महत्येदिवशी पसरली आणि त्यानंतर पाठोपाठ आत्महत्या झाल्याने ग्रामस्थांना हे रोखायचे कसे, असा प्रश्न पडला आहे.

समुपदेशन शिबिर

आत्महत्या सुरू झाल्याने शिवाजी विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाचे डॉ. प्रसन्न करंबळकर यांनी गावातील तरुणांशी संवाद साधला. आत्महत्या करणे चुकीचे आहे. तरुणांनी आपल्याला अडचणी असतील तर पालकांशी अथवा मित्रमैत्रिणीबरोबर संवाद साधा, असा सल्ला त्यांनी दिला तरीही आत्महत्या झाल्याने खळबळ उडाली.


तरुणांच्या आत्महत्येमुळे गावात पालकांत चिंता वाढत आहे. त्या टाळण्यासाठी समुपदेशनही करण्यात आले. परंतु त्यालाही यश आले नाही. ही लाट थोपवण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. -सुभाष पाटील, यशवंत बँकेचे संचालक, वाकरे

अशा झाल्या आत्महत्या

  • ९ डिसेंबर २०२२ : युवराज भिकाजी पोवार (वय २७)
  • १३ डिसेंबर २०२२ : शुभम एकनाथ पोवार (वय २६)
  • १७ जानेवारी २०२३ : नितीन विलास मोरे (वय २२)
  • ३१ जानेवारी २०२३ : विशाल रामचंद्र कांबळे (वय २६)


आत्महत्येची कारणे...

कोणतेच गंभीर कारण नसताना जर आत्महत्या होत असतील तर त्यामागे श्रद्धा-अंधश्रद्धेचे कारण असू शकते. त्या दृष्टीनेही ग्रामस्थांनी विचार करावा व त्यास पायबंद घालावा, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पी. एम. चौगले यांनी सूचविले आहे. वाकरे (ता. करवीर) येथील आत्महत्या सत्र कशामुळे होत असेल व ते कसे रोखायचे, अशी विचारणा ‘लोकमत’ने त्यांच्याकडे केली. त्यांनी यामागील संभाव्य चार कारणे दिली.

  • देवदेवतांनी सांगितले, शाप दिला म्हणून आत्महत्या केली जावू शकते. त्या देवदेवतांवर या तरुणांची श्रद्धा असू शकते, त्यांचा प्रभाव असू शकतो. जेव्हा अन्य कोणतेच भौतिक, आर्थिक, आरोग्यविषयक कारण नसते तेव्हा होणाऱ्या आत्महत्यांमागे अंधश्रद्धा असू शकते.
  • या तरुणांचे लग्न ठरत नव्हते म्हणून आत्महत्या झाल्या का, याचाही शोध घेतला जावा.
  • करिअरमध्ये वैफल्य आल्यावर तरुणांत हा विचार बळावतो.
  • नैराश्यातून आत्महत्येचा विचार येऊ शकतो; पण त्याचे धाडस होत नाही. जेव्हा कोणतरी एकजण तसे अविचारी पाऊल उचलतो तेव्हा इतरही धाडस करतात.
  • जवळच्या व्यक्तीने एकाकी जीवन संपवले तर त्यातूनही कमालीचे वैफल्य येऊन आत्महत्या केली जाते. तसा काही बंध या तरुणांमध्ये आहे का, हे तपासले पाहिजे.
     

Web Title: Youth's suicide stirs excitement in Vakre village of Kolhapur district, Superstitious rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.