तरुणाईला पदभ्रमंती मोहिमांचे वेध
By admin | Published: November 16, 2015 11:32 PM2015-11-16T23:32:07+5:302015-11-17T00:01:43+5:30
दिवाळीची सुट्टी : कसबा बावड्यातून भटकंतीला जाणारे २0 गट
कसबा बावडा : दिवाळीच्या सुट्टीमुळे कसबा बावड्यातील हायकर्स ग्रुपना आता पदभ्रमंती मोहिमेचे वेध लागले असून त्याची तयारी आता सुरू झाली आहे. शुक्रवारी (दि. १३) दिवाळी-भाऊबीज सण झाल्यानंतर हायकर्स ग्रुप सह्याद्रीच्या कुशीत भटकंतीसाठी बाहेर पडणार आहेत. बावड्यातून प्रत्येकवर्षी दिवाळीच्या सुट्टीत भटकंतीसाठी जाणारे १५ ते २० ग्रुप आहेत. त्यात ज्येष्ठ नागरिकांचा ‘हनुमान हायकर्स ग्रुप’ आजही आघाडीवर आहे.
पन्हाळा, गगनबावडा, दाजीपूर, वासोटा, रांगणा, विशाळगड, तिल्लारी, कडगाव-पारगाव, कास, महाबळेश्वर, जावळीचे खोरे, भैरवगड, आदी परिसरात भटकंती करण्यास तरुणाई जास्त पसंती देते. नुकतीच दिवाळी झाल्यामुळे या पदभ्रमंतीला काही ग्रुपनी सुरुवात केली आहे. शूज, सॅक, टोपी, कमरेला पाण्याची बाटली, हातात काठी, टी-शर्ट, जीन पँट किंवा बर्मुडा असा पोशाख परिधान करून तरुणाई पदभ्रमंतीला जात असते.
सातारा जिल्ह्यातील वासोटा, जावळीचे खोरे तसेच कोयना परिसर पदभ्रमंतीसाठी मोठा आनंद देणारी ठिकाणे आहेत, पण तितकीच ती धोक्याचीसुद्धा आहेत. सलग दोन-तीन दिवस या जंगलात पदभ्रमंती करावी लागते. या जंगलात अस्वलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे चालण्याची तयारी, धाडस असणाऱ्यांनीच या पदभ्रमंतीसाठी बाहेर जावे, असे येथील नेहमी पदभ्रमंतीसाठी जाणाऱ्या अनेक युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पदभ्रमंतीमुळे निसर्गाशी जवळीक साधता येते. पानं, फुले, वेली विविध वृक्षांची माहिती होते. विविध प्राणी जवळून पाहावयास मिळतात. विषारी, बिनविषारी प्राण्याची माहिती एखाद्या वाटाड्याकडून आपणास मिळते. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर जंगलात आल्यामुळे मनाला समाधान मिळते, असे पदभ्रमंती करणाऱ्यांचे मत आहे. (प्रतिनिधी)
माहिती सहज उपलब्ध
जंगल परिसरात भटकायचे कसे? काय पाहायचे? कोठे पाहायचे? जायचे कसे? तेथे धोका काय आहे? विविध किल्यांचा इतिहास, जाणाऱ्या वाटा यांची सविस्तर माहिती आता विविध लेखांमधून व पुस्तकांमधून मिळू लागल्याने भटकंती करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ग्रुप आता पुढे आले आहेत.