डंपरच्या धडकेत तरूण ठार
By admin | Published: June 19, 2016 01:27 AM2016-06-19T01:27:11+5:302016-06-19T01:27:11+5:30
इचलकरंजीतील सांगली रोडवरील घटना : संतप्त जमावाकडून डंपरवर दगडफेक
इचलकरंजी : येथील सांगली रोडवर मुरुम वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरच्या धडकेत यंत्रमाग कामगार जागीच ठार झाला. सूरज दिलीप मोरे (वय २६, रा. साईट नंबर १०२) असे त्याचे नाव आहे. हा अपघात शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करून तो पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सहकारनगर साईट नंबर १०२ परिसरात राहणारा सूरज मोरे हा यंत्रमाग कारखान्यात कामास होता. आपल्या मावस भावाला इचलकरंजी येथे सोडून तो सकाळी आपल्या होंडा शाईन या मोटारसायकलीवरून सहकारनगरकडे घरी परतत होता. या दरम्यान इचलकरंजीहून सांगली नाक्याकडे निघालेल्या भरधाव डंपर (एमएच ०९ सीए ७११) ने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात सूरज हा डंपरखाली सापडला. याचवेळी नागरिकांनी आरडाओरडा केल्याने चालकाने डंपर थांबवला व पुन्हा पाठीमागे घेतला. त्यामुळे सूरजच्या अंगावरून दोनदा डंपर गेला. यामध्ये तो जागीच ठार झाला. याबाबतची माहिती कळताच सूरज याच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने डंपरवर दगडफेक करून काचा फोडल्या. तसेच डिझेलची टाकी फोडून डंपर पेटविण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळाल्यानंतर गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह आयजीएम रुग्णालयात आणून विच्छेदन केले.
अपघाताची वर्दी गणेश बगाडे यांनी गावभाग पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज सूर्यवंशी करत आहेत. सूरज हा मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या मृत्यूमुळे सहकारनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. (वार्ताहर)