कोल्हापूरच्या युनुस मौलवींची रिक्षा ‘महाराष्ट्र सुंदरी’, तर देवार्डेंची ‘कोल्हापूर सुंदरी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:17 IST2025-01-28T17:16:25+5:302025-01-28T17:17:02+5:30
रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे रौप्यमहोत्सवी वर्षी, रिव्हर्स रिक्षांचीही प्रात्यक्षिके

कोल्हापूरच्या युनुस मौलवींची रिक्षा ‘महाराष्ट्र सुंदरी’, तर देवार्डेंची ‘कोल्हापूर सुंदरी’
कोल्हापूर : कोल्हापूरच्या युनुस मौलवी यांच्या रिक्षाने ‘महाराष्ट्र सुंदरी’, तर गडहिंग्लजच्या तानाजी देवार्डे यांच्या रिक्षाने ‘कोल्हापूर सुंदरी’चा किताब पटकावला. या दोघांनाही प्रत्येकी २५ हजार २५ रुपयांचे रोख पारितोषिक आणि पदक बहाल करण्यात आले. यावेळी सांगलीच्या संतोष जाधव यांनी दोन चाकावर आणि रिव्हर्स रिक्षा चालवून टाळ्या घेतल्या.
अनेक बाबतीत वेगळेपण जपणाऱ्या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र रिक्षाचालक सेना आणि निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळाच्या वतीने रौप्यमहोत्सवी रिक्षा सौंदर्य स्पर्धा रविवारी घेण्यात आल्या. एकापेक्षा एक स्वच्छ, विविध कलाकौशल्य आणि संकल्पनेतू सजविलेल्या रिक्षा या स्पर्धेच्या निमित्ताने पहावयास मिळाल्या. महाराष्ट्र, कर्नाटकसह गोव्यातील अनेकांनी या स्पर्धेला उपस्थित राहून आनंद घेतला.
सन २०२१ पूर्वीच्या रिक्षा गटामध्ये साई पुसाळकर रत्नागिरी देवरूख, ईजास शेख बेळगाव यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा तर अनिकेत पाटील पुणे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. त्यांना अनुक्रमे १५०२५, १००२५ आणि ५०२५ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. सन २०२१ नंतरच्या रिक्षा गटामध्ये अतुल पोवार, कोल्हापूर, सरताज मालदार मलकापूर, ओंकार उगी पंढरपूर यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. त्यांनाही वरील प्रमाणे रोख बक्षिसे देण्यात आली.
पृथ्वीराज महाडिक, रिक्षाचालक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जाधव, ज्येष्ठ रिक्षाचालक सुधाकर चव्हाण, पांडुरंग पाटील, जयसिंग पाटील, श्यामराव माने, प्रकाश पाटील, संदीप जाधव, सुनील लाड, वैभव भोसले, मदन साठे, चंद्रकांत भोसले, मोहन बागडी, वसंत पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. तर उद्धवसेनेचे विजय देवणे, प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, किरण पडवळ, नीलेश कदम, श्यामराव पाटील, आशिष मांडवकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
काय तो देखणेपणा, काय ती सजावट
महाराष्ट्र सुंदरी ठरलेल्या युनुस मौलवी यांची रिक्षा कलात्मकतेने सजवण्यात आली होती. गड आला, पण सिंह गेला ही संकल्पना रिक्षावर साकारताना त्यांनी साइड पॅनल बसवले होते. दाराच्या काचेला एका बाजूला शिवाजी महाराज, दुसऱ्या बाजूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र लावले होते. पाठीमागे किल्ल्याची प्रतिकृती होती, तर गडहिंग्लजच्या कोल्हापूर सुंदरी ठरलेल्या रिक्षासमोरही किल्ल्याचे बुरूज साकारण्यात आले होते. पाठीमागे अंबाबाईचे मंदिर रेखाटले होते तर एका बाजूला श्रीरामाची प्रतिकृती चितारण्यात आली होती.